देवणीला टंचाईच्या झळा
By Admin | Updated: October 29, 2014 00:45 IST2014-10-29T00:39:03+5:302014-10-29T00:45:17+5:30
मेश कोतवाल , देवणी यंदा देवणी तालुक्यात सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नसल्याने जवळपास सर्वच जलस्त्रोत कोरडे राहिले आहेत़ त्यामुळे दिवाळीतच नागरिकांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत़

देवणीला टंचाईच्या झळा
रमेश कोतवाल , देवणी
यंदा देवणी तालुक्यात सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नसल्याने जवळपास सर्वच जलस्त्रोत कोरडे राहिले आहेत़ त्यामुळे दिवाळीतच नागरिकांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत़ त्याअनुषंगाने पंचायत समिती व महसूल विभागाने कृती आराखडा तयार केला असून, त्यात १ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़
देवणी तालुक्यात यंदा जवळपास ४०० मिमी इतकाच पाऊस झाला आहे़ त्यामुळे खरीप व रबी हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेले़ आता पाणीच नसल्याने सामान्यांना टंचाईलाही सामोरे जावे लागत आहे़ तालुक्यातील मांजरा, मानमोडी व देवनदी यावेळी प्रवाहित झालीच नाही़ तसेच धनेगाव व सिंधीकामठ येथील बंधाऱ्यातही पुरेसा जलसाठा झाला नाही़ भोपणी प्रकल्पातही पाणी नाही़
वागदरी, बोरोळ, लासोना, गुरनाळ, आनंदवाडी, दरेवाडी, अनंतवाडी लघुप्रकल्पही कोरडे राहिले आहेत़ त्याचा परिणाम इतर जलस्त्रोतांवरही झाला़ त्यामुळे दिवाळीपासूनच नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ देवणी शहरात तर नागरिकांना आड, विहिरींवरुन पाणी मिळवावे लागत आहे़
दरम्यान, प्रशासनाने पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे़ पुढील ९ महिन्यांसाठी तयार केलेल्या आराखड्यात तालुक्यासाठी १ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती तहसीलदार अहिल्या गाठाळ व गटविकास अधिकारी एस़ए़ अकेले यांनी दिली़ आॅक्टोबर ते डिसेंबरच्या पहिल्या टप्प्यात १० गावे ३ वाड्यांना टँकर, अधिग्रहणाद्वारे पाणी देण्यात येईल़ त्यासाठी २० लाख ४८ हजार रुपयांची तरतूद केली आहे़ दुसऱ्या टप्प्यात ३१ गावे, १० वाड्यांसाठी ३४ लाख ५६ हजार तर तिसऱ्या टप्प्यात ३९ गावे व १२ वाड्यांसाठी ४५ लाख ३६ हजार रुपयांची तरतूद आहे़
पहिल्या टप्प्यात देवणी तालुक्यातील देवणी शहर, येणगेवाडी, नेकनाळ, तळेगाव, कोनाळी, चवणहिप्परगा, इस्मालवाडी, बोरोळ, दवणहिप्परगा, वडमुरंबी, विळेगाव येथे पाणी टंचाई जाणवणार आहे़ त्याअनुषंगाने टंचाई कक्ष स्थापन करण्यात आला असून, दोन पूर्णवेळ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत़ भविष्यात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवणार असल्याने ते जपून वापरण्याचे आवाहन गटविकास अधिकारी एस़ए़ अकेले यांनी केले आहे़