शिकवणी शुल्क पाहता ‘सेवा’ नाही..!
By Admin | Updated: July 12, 2014 01:14 IST2014-07-12T00:11:15+5:302014-07-12T01:14:49+5:30
चेतन धनुरे, लातूर शिकवण्यांचा आगळाच पॅटर्न निर्माण केलेल्या काही क्लासेसवाल्यांनी ‘खास विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या आग्रहास्तव’ असा लटका आव आणत कमाईचे नवनवे फंडे शोधून काढले आहेत़
शिकवणी शुल्क पाहता ‘सेवा’ नाही..!
चेतन धनुरे, लातूर
शिकवण्यांचा आगळाच पॅटर्न निर्माण केलेल्या काही क्लासेसवाल्यांनी ‘खास विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या आग्रहास्तव’ असा लटका आव आणत कमाईचे नवनवे फंडे शोधून काढले आहेत़ नियमित अकरावी व बारावीच्या क्लासेससोबतच रिपीटर बॅचलाही घसघशीत शुल्क आकारले जाते़ इतकेच नव्हे तर दोन महिन्यांच्या क्रॅश कोर्सलाही १० ते १५ हजार रुपये शुल्क आकारले जाते़ शुल्कावर सेवाकर असला तरी सेवा कुठेच दिसत नाही.
लातुरातील नामांकित महाविद्यालयांनी अतिरिक्त वर्ग सुरु केल्याने विद्यार्थ्यांचा सायंकाळपर्यंतचा वेळ महाविद्यालयतच जातो़ त्यामुळे क्लासेसवाल्यांनी त्यांच्या सोयीसाठी नियमित बॅचेसची वेळच सायंकाळी ७ ते १० अशी करुन ठेवली आहे़ तीन विषयांच्या शिकवण्या एका पाठोपाठ लगेच सुरु होतात़ विद्यार्थी सकाळपासून संध्याकाळपर्यंत अभ्यासात राहील, अशी पालकांची इच्छा असते, त्या काळजीपोटी ते धडपड करतात. पण ८० ते १०० मुलांमध्ये शिकणारा मुलगा क्लासेसमध्ये ४०० ते १२०० मुलांमध्ये राहून शिकेल यावर ते आग्रही दिसतात. शाळांच्या शुल्कावर बोलणारे क्लासेसवर बोलत नाहीत. शुल्काचे इमले क्लासेसच्या इमल्याहून मोठे आहेत. लातुरात तर त्यासाठी राज्यभरातून विद्यार्थी लातुरात येत आहेत़ पूर्वी शिकवण्यातही ‘गरिब’ मुलांना सवलतीत कदर असे. आता हे दिसत नाही. त्यांनाही नियमित बॅचेसप्रमाणेच १५ ते २० हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारण्यात येते़ या रिपीटर बॅचची उलाढाल जवळपास १० कोटींपर्यंत आहे़ हे कमी म्हणून की काय, परीक्षेच्या तोंडावर क्रॅश कोर्सही आहेतच. दोन महिन्यांसाठी प्रति विषय १० ते १५ हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारणी करण्यात येते़ या कोर्सचीही उलाढाल १० कोटींहून अधिक आहे़ सेवा क्षेत्रातील क्लासेसच्या शुल्कावर मर्यादा घालता येतात का यावर विचार व्हायला हवा, अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते डॉ. नितीन भराटे यांनी मांडली.
‘सेवा कर’ची गोपनीयता..?
वर्षातून कधीतरी तपासणी करणाऱ्या केंद्रीय सेवा शुल्क विभाग मग नेमकी काय तपासणी करते, असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे़ त्यांच्याकडे चौकशी केली असता माहिती ‘गोपनीय’ ठेवावी लागते, असे सांगितले जाते.