रस्ता नसल्याने ग्रामस्थांना रोजच द्यावी लागते अग्निपरीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:06 IST2021-09-27T04:06:02+5:302021-09-27T04:06:02+5:30
नाचनवेल : चपला, बूट हातात घ्या, अंगावरील करडे सावरत चिखल तुडवित मजल दरमजल करून सिमेंट बंधाऱ्यापर्यंत पोहचायचे. त्यानंतर बंधाऱ्याच्या ...

रस्ता नसल्याने ग्रामस्थांना रोजच द्यावी लागते अग्निपरीक्षा
नाचनवेल : चपला, बूट हातात घ्या, अंगावरील करडे सावरत चिखल तुडवित मजल दरमजल करून सिमेंट बंधाऱ्यापर्यंत पोहचायचे. त्यानंतर बंधाऱ्याच्या अरुंद आणि निसरड्या भिंतीवरून वाहणाऱ्या फूटभर पाण्यातून तोल सावरत जायचे. त्यानंतर भिंतीशेजारील झाडावर चढून पैलतीरावर उतरायचे. ही परिस्थिती काही सैन्यभरतीसाठी सुरू असलेली कसरत नाही.
हे भीषण वास्तव आहे नाचनवेल ते कोपरवेल या दोन्ही गावांमधील येथील अंजना नदीवर जाण्यासाठी पूल व रस्ता नसल्याने मागील कित्येक वर्षांपासून येथील नागरिकांना अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागत आहे. भिकनशहा बाबा मंदिराजवळ असलेला पूल वाहून गेल्यावर नदी ओलांडून दुसऱ्या तीरावर जाण्यासाठी पर्यायी मार्ग नाही.
परिणामी येथील नागरिकांना सिमेंट बंधाऱ्याच्या भिंतीवर लोखंडी दरवाजे टाकून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. मात्र, आता भिंतीच्या शेजारील मातीचा भराव वाहून गेल्याने नदीपात्र दोन्ही बाजूंनी वळल्या गेल्याने हा प्रवास आणखीनच जीवघेणा ठरत आहे. पुरामुळे उन्मळून पडलेल्या झाडाचा आधार घेत भिंतीवरून पैलतीरी जावे लागत आहे. परंतू हे सर्वांना शक्य होत नाही. आता तरी संबंधित प्रशासनाने पूल बांधावा, अशी मागणी केली जात आहे.
---
शेतात तळे अन् तळ्यात पिके
आठवडाभरापासून सलग सुरू असलेल्या पावसामुळे पिके व रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सुरुवातीला शेतशिवारात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. मात्र. रोजच हजेरी लावणाऱ्या पावसाने त्यांना हात टेकावे लागले. शेतात तुंबलेले तळे, कपाशीच्या सडणाऱ्या कैऱ्या, मोड आलेले सोयाबीन, पिवळी पडणारी आद्रक यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
-----
फोटो : फाईल मॅनेजरमधून तयार करण्यासाठी सोडलेला आहे.
ओळ : सिमेंट बंधाऱ्यांच्या अरुंद भिंतीवरून पैलतीरी जाण्यासाठी नागरिकांना असा जीवघेणा प्रवास करावा लागतो.