शिवसेनेत गटबाजी नाही, जिल्हा प्रमुखावर फोडले खापर
By Admin | Updated: January 25, 2017 00:43 IST2017-01-25T00:40:16+5:302017-01-25T00:43:26+5:30
उस्मानाबाद : पालकमंत्री दिवाकर रावते हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत़

शिवसेनेत गटबाजी नाही, जिल्हा प्रमुखावर फोडले खापर
उस्मानाबाद : पालकमंत्री दिवाकर रावते हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत़ त्यामुळे त्यांच्या बैठकीकडे पाठ फिरविली, अशा पध्दतीच्या बातम्या निराधार असल्याचे सांगत रावते यांच्या दौऱ्याबाबतची माहिती जिल्हाप्रमुखांनी योग्य पध्दतीने पदाधिकाऱ्यांपर्यंत न पोहोचविल्यानेच काहीजण या बैठकीला गैरहजर राहिल्याचा खुलासा आ़ तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला़
पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर दिवाकर रावते दोन दिवसाच्या उस्मानाबाद दौऱ्यावर आले होते़ या दौऱ्यादरम्यान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने परंडा आणि भूम येथे झालेल्या बैठकांना सेनेतील काही पदाधिकारी गैरहजर होते़ या प्रकारामुळे सेनेत गटबाजी असल्याची चर्चा सुरू झाली होती़ मात्र, सावंत यांनी याचा स्पष्ट शब्दात इन्कार करीत शिवसेना एकसंघ असल्याचे सांगितले़ दिवाकर रावते हे मागील अनेक वर्षापासून सेनेचे ज्येष्ठ तसेच कुशल नेते आहेत़ त्यामुळे शिवसैनिकांनी त्यांच्या बैठकीकडे पाठ फिरविण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ते म्हणाले़
नगर परिषद निवडणुकीमध्ये जिल्ह्यात जिल्ह्यातील महत्त्वाच्या असलेल्या उस्मानाबाद नगर पालिकेत सत्ता मिळविण्यात आम्हाला यश आले आहे़ होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही शिवसेना आपली ताकद दाखवून देईल, असा विश्वासही सावंत यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केला़ या परिषदेला सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, माजी आ़ ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी आ़ ज्ञानेश्वर पाटील, उपनगराध्यक्ष सुरज साळुंके आदींची प्रमुख उपस्थिती होती़ सुत्रसंचलन माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे यांनी केले.