तेर ग्रामीण रुग्णालयावर नाही कुणाचाच अंकुश
By Admin | Updated: November 10, 2014 23:57 IST2014-11-10T23:47:01+5:302014-11-10T23:57:11+5:30
उस्मानाबाद : तेर येथील ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोरताळे हे रूजू झाल्यापासून कधीच मुख्यालयी राहत नसल्याचे स्पष्ट करीत या रूग्णालयावर वरिष्ठांचा अंकुश नसल्याचा अहवाल

तेर ग्रामीण रुग्णालयावर नाही कुणाचाच अंकुश
उस्मानाबाद : तेर येथील ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोरताळे हे रूजू झाल्यापासून कधीच मुख्यालयी राहत नसल्याचे स्पष्ट करीत या रूग्णालयावर वरिष्ठांचा अंकुश नसल्याचा अहवाल तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी सुभाष काकडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील रामभाऊ देवकते (वय ७०) यांना रविवारी सकाळी चक्कर आल्यामुळे तेर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर काही वेळाने डॉ. पल्ला यांनी रूग्णालयात येऊन त्यांची तपासणी केली व देवकते यांना मृत घोषित केले. यावर नातेवाईकांनी वेळेवर उपचार न मिळाल्यामुळेच देवकते यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत प्रेत ताब्यात घेण्यासही नकार दिला होता. तसेच यापूर्वीदेखील १७ आॅक्टोबर रोजी असाच प्रकार घडला होता. या दोन्ही घटनांबाबत प्राप्त तक्रारीवरून तहसीलदार काकडे यांनी तेर येथे जाऊन सखोल चौकशी केली. यावेळी उस्मानाबाद उपविभागीय अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, सहाय्यक पोलिस निरीक्षक ढोकी हेही उपस्थित होते.
मयताच्या नातवाईकांनी केलेल्या तक्रारी बाबत वैद्यकिय अधिकारी डॉ. पल्ला, वैद्यकिय अधिक्षक डॉ. मोरताळे, अधिपरिचारीका आदींचे जबाबत घेण्यात आले. यात रविवारी रुग्णालयात कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर झालेली परिस्थिती ही संबधित वैद्यकीय अधिक्षक डॉ. मोरताळे यांच्या वर्तनामुळे निर्माण झाल्याचे सकृत दर्शन दिसून येत असल्याचे तहसीलदारांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे. डॉ. मोरताळे हे तेर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयास रुजु झाल्या पासून मुख्यालयास राहत नाहीत, त्यामुळे सदर रुग्णालयातील प्रशासनावर कोणाचाही अंकुश राहिलेला नसल्याचे नागरिकांनी दिलेल्या माहितीवरुन दिसून येते, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, दोन्ही घटनेस जबाबदार असणाऱ्या संबधित वैद्यकिय अधिकारी, अधिक्षक तसेच कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांना समक्ष सूचना दिल्या असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. दरम्यान, या अहवालानंतर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)