सोन्नेवाडीत काविळीचे सोळा रूग्ण आढळले
By Admin | Updated: September 2, 2014 01:51 IST2014-09-02T00:47:01+5:302014-09-02T01:51:10+5:30
ईट : भूम तालुक्यातील सोन्नेवाडी गावामध्ये दहा दिवसांपासून पडत असलेल्या पाण्यामुळे एका जलस्त्रोताचे पाणी दुषित होऊन गावात काविळीची साथ पसरली आहे.

सोन्नेवाडीत काविळीचे सोळा रूग्ण आढळले
ईट : भूम तालुक्यातील सोन्नेवाडी गावामध्ये दहा दिवसांपासून पडत असलेल्या पाण्यामुळे एका जलस्त्रोताचे पाणी दुषित होऊन गावात काविळीची साथ पसरली आहे. सोमवारी येथे या आजाराचे १६ रुग्ण आढळले आहेत. वैद्यकीय विभागाचे पथक याठिकाणी सहा दिवसांपासून तळ ठोकून असून, ही साथ आटोक्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र भराटे यांनी सांगितले.
मागील १० ते १५ दिवसांपासून परिसरात दमदार पाऊस होत असल्याने भूगर्भातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. या गावच्या पाणी पुरवठा योजनेच्या पाण्यामध्ये नियमितपणे टीसीएल पावडरचा वापर करण्यात येत असल्याने हे पाणी पिण्यायोग्य आहे. परंतु, एका बोअरचे पाणी अशुध्द झाले असून, ते पाणी पिण्यासाठी वापरलेल्या ग्रामस्थांना कावीळ साथरोगाची लागण झाली आहे. २७ आॅगस्ट रोजी पहिल्यांदा अशा लक्षणाचा रूग्ण आढळून येताच सरपंच सतीश सोन्ने यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. खराडे यांच्याशी संपर्क साधली. यानंतर डॉ. पोत्रे यांच्यासह एक पथक याठिकाणी पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, अशी लक्षणे असलेली जवळपास १६ रुग्ण या गावात आढळून आल्याने १७ आॅगस्टपासून आजपर्यंत ईट प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. रवींद्र भराटे यांच्यासह एक पथक येथे ग्रा.पं. कार्यालयामध्ये तळ ठोकून आहे. यामध्ये आरोग्य सेविका आर. जी. राठोड, एस.व्ही. पवार व एस.एन.मिसाळ यांचा समावेश आहे. याठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरु करुन दररोज रुग्णांची तपासणी केली जाते. सर्व मिळून ३० ते ४० रुग्णांची तपासणी करुन त्यांना औषधोपचार केला जातो. तसेच सध्या ही साथ आटोक्यात आल्याची माहिती डॉ. रवींद्र भराटे यांनी यावेळी दिली. गावातील इतर सर्व जलस्त्रोताचे निर्जंतुकीकरणाचे कामही आरोग्य सेवक व ग्रा.पं. च्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)