गावस्तरावर दक्षता समित्याच नाहीत !
By Admin | Updated: January 8, 2017 23:31 IST2017-01-08T23:30:41+5:302017-01-08T23:31:35+5:30
लातूर रोजगार हमी योजनेमार्फत गावस्तरावर करण्यात येणाऱ्या विविध कामांच्या देखरेखीसाठी दक्षता समित्या स्थापन करण्याच्या शासनाच्या आदेशाला ग्रामपंचायतींनी केराची टोपली दाखविली आहे.

गावस्तरावर दक्षता समित्याच नाहीत !
आशपाक पठाण लातूर
रोजगार हमी योजनेमार्फत गावस्तरावर करण्यात येणाऱ्या विविध कामांच्या देखरेखीसाठी दक्षता समित्या स्थापन करण्याच्या शासनाच्या आदेशाला ग्रामपंचायतींनी केराची टोपली दाखविली आहे. लातूर जिल्ह्यातील ७८७ ग्रामपंचायतींपैकी एकाही ग्रामपंचायतीने समिती स्थापन केली नाही. परिणामी, कामाची गुणवत्ता आणि देखरेख सरकारी अधिकाऱ्यांवरच अवलंबून आहे.
केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर ग्रामपंचायतस्तरावर स्थानिक देखरेख व दक्षता समिती गठित करण्यात आली नाही. त्यामुळे रोहयोचे राज्याचे उपसचिव डॉ. प्रमोद शिंदे यांनी १३ आॅक्टोबर २०१६ रोजी अध्यादेश काढून सर्व जिल्हा परिषदांना गावस्तरावर समिती गठित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा व गावस्तरावर डोकेदुखी नको म्हणून ग्रामपंचायतींनी केलेले दुर्लक्ष यामुळेच तीन महिने लोटले तरी अद्याप एकाही गावात समिती नियुक्त नाही. रोहयोची कामे कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या मनमानीप्रमाणेच केली जातात. अनेक ठिकाणी बोगस मजूर दाखवून यंत्राच्या सहाय्याने कामे करून घेतल्याचे प्रकार पुढे आले आहेत. गरजू मजुरांना रोजगार मिळावा. शिवाय, कामही गुणवत्तापूर्ण व्हावे, यासाठीच गावस्तरावर समिती गठित करण्याचे आदेश असतानाही याकडे ‘जाणीव’पूर्वक कानाडोळा करण्यात आला आहे. समिती गठित करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना देण्यात आले असले तरी शासकीय अधिकारी किंवा ग्रामसेवकांच्या उदासीनतेमुळे समित्या रखडल्याचे दिसून येत आहे.