रिपाइंचा एकही आमदार नाही, आत्मचिंतन करा

By Admin | Updated: November 9, 2016 00:53 IST2016-11-09T00:54:30+5:302016-11-09T00:53:39+5:30

उस्मानाबाद : मी स्वत: कधीही निवडणुकीसाठी आग्रही राहिलो नाही.

There are no single MLAs in the RPI, do self-control | रिपाइंचा एकही आमदार नाही, आत्मचिंतन करा

रिपाइंचा एकही आमदार नाही, आत्मचिंतन करा

उस्मानाबाद : मी स्वत: कधीही निवडणुकीसाठी आग्रही राहिलो नाही. पद असो-नसो; जनतेची कामे करीत गेलो आणि म्हणूनच केंद्रीय मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. प्रामाणिकपणे काम केल्यास निश्चितपणे जनतेचे प्रश्न सोडविता येतात. त्यामुळे पद, सत्तेची अपेक्षा न ठेवता एकनिष्ठपणे काम करा. इतकी वर्षे संघटन कार्यरत असूनही पक्षाचा एकही आमदार निवडून का येत नाही, याबाबत आत्मचिंतन करा, असा सल्ला सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्यावतीने शहरातील भीमनगर भागातील क्रांती चौकात आठवले यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. व्यासपीठावर पक्षाचे ज्येष्ठ नेते राजा सरवदे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ, जि.प.चे समाजकल्याण सभापती हरिष डावरे, रिपाइंचे प्रदेश चिटणीस संजय बनसोडे, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय शिंगाडे आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
उस्मानाबाद जिल्ह्याशी माझे ऋणानुबंध आहेत. पँथरच्या चळवळीत हा जिल्हा मोठ्या ताकदीने माझ्या मागे उभा होता. अनेक वर्षे कसल्याही पदाची अपेक्षा न ठेवता मी जनतेची कामे करीत राहिलो. त्यामुळेच नरेंद्र मोदींनी मंत्रीमंडळात समावेश करून घेतल्याचे सांगत भाजपा सरकारने देशातील मागासवर्गीयांसाठी अनेक चांगल्या योजना सुरू केल्या असून, हे सरकार संविधानाला हात लावणार नाही, अशी ग्वाहीही दिली असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळात मी स्वत: असल्याने देशाची घटना तसेच मागासवर्गीय, कष्टकरी, वंचितांच्या हितासाठी सदैव जागरूक राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी माझी पूर्वीपासूनची भूमिका आहे. हे आरक्षण देताना अनुसूचित जाती-जमाती तसेच ओबीसींच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, ही बाबही आपण स्पष्ट केली असल्याचे ते म्हणाले. आरक्षणाला पाठिंबा असला तरी अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात मात्र कसलाही बदल होवू देणार नाही. कारण तो कायदा अत्याचार रोखण्यासाठी आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: There are no single MLAs in the RPI, do self-control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.