... तर बँकेच्या दारात बसू
By Admin | Updated: May 16, 2016 23:56 IST2016-05-16T23:54:01+5:302016-05-16T23:56:03+5:30
हिंगोली : शेतकरी हा निसर्गाच्या अवकृपेमुळे तब्बल चार वर्षांपासून डबघाईला आला आहे. त्याच्यावर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे.

... तर बँकेच्या दारात बसू
हिंगोली : शेतकरी हा निसर्गाच्या अवकृपेमुळे तब्बल चार वर्षांपासून डबघाईला आला आहे. त्याच्यावर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. त्यामुळे बँकांनी मागेल त्याला पीककर्ज दिलेच पाहिजे नसता आम्ही बँकेच्या दारात बसू असा इशारा फळबागा वाचवा अभियान व खरीप हंगाम नियोजन शेतकरी मेळाव्यात खा. राजीव सातव यांनी दिला.
आ. तान्हाजी मुटकुळे, आ. डॉ. संतोष टारफे, जिल्हाधिकारी तुकाराम कासार, सीईओ मधुकर आर्दड, अ. मुकाअ ए. एम. देशमुख, तहसीलदार किरण अंबेकर, डॉ. पी. पी. शेळके, कृषी शास्त्रज्ञ आळसे, जयाजी पाईकराव आदींची उपस्थिती होती. सातव म्हणाले, कोणाच्याही चुका न काढता, सद्य:परिस्थितीत शेकऱ्याला वाचविण्यासाठी कोणते प्रयत्न शक्य आहेत ते करा. कोणती बँक कर्ज देत नसेल तर शेतकऱ्यांनी आ. मुटकुळे, आ. टारफे व माझ्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सातव यांनी केले. पाणीटंचाई निवारणात गतिमानता नाही. पावसाळा आला तरीही प्रस्ताव मंजुरीतच आहेत. पशुसंवर्धनच्या कामकाजाबद्दलही खा. सातव यांनी नाराजी व्यक्त केली. सध्या गुरांना साथरोग सुरु असून पावसापूर्वी व नंतरचे साथरोग आटोक्यात आणण्यासाठी या विभागाचे अधिकारी सज्ज असणे गरजेचे असतानाही ते राहत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी कासार म्हणाले, फळबाग वाचवा अभियान राबवायला उशिर झाला. त्याऐवजी शेतकरी वाचवा अभियान असा उलेख करुन उर्वरितांसाठी तरी प्रशासनासह सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. पीककर्जासाठी तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना तालुका स्तरावर बँक अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दर सोमवारी सायंकाळी ४ ते ५ या वेळात बैठका होतील. आ. मुटकुळे म्हणाले, सध्याचे सिंचनक्षेत्र दहा टक्के असून ते चाळीस टक्क्यांवर नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी आम्ही राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवू. मात्र प्रशासनानेही तेवढ्याच नेटाने कामे केली पाहिजेत. आ. टारफे म्हणाले, दुष्काळामुळे कृषी विभागाने अनुदानावर बी-बियाणे दिले पाहिजे. शिवाय पालकमंत्र्यांनी आदेश देवूनही टँकर सुरू होत नाही. मागेल त्याला शेततळे नुसते मंजूर झाले. कामांचा पत्ता नाही. जलयुक्तची कामेही गतिमान होणे गरजेचे आहे. प्रास्ताविक लोंढे यांनी तर आर. बी. हरणे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)