रोजचेच मृत्यूचे तांडव वाढवतेय त्यांचे नैराश्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:05 IST2021-05-07T04:05:31+5:302021-05-07T04:05:31+5:30
'डॉक्टर काय किंवा नर्स काय, त्यांना सवयच असते', असे सर्वसामान्य माणूस अगदी सहज बोलून जातो, पण रोजच डोळ्यासमोर मृत्यू ...

रोजचेच मृत्यूचे तांडव वाढवतेय त्यांचे नैराश्य
'डॉक्टर काय किंवा नर्स काय, त्यांना सवयच असते', असे सर्वसामान्य माणूस अगदी सहज बोलून जातो, पण रोजच डोळ्यासमोर मृत्यू पाहणे, डॉक्टर आणि नर्सलाही आता हेलावून टाकत आहे. नैराश्य, मानसिक ताण-तणाव आणि शारीरिक थकवा यामुळे आता अनेक डॉक्टर आणि नर्सेसना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे, असे मानसशास्त्राच्या अभ्यासक प्रा. अनघा पाटील यांनी नमूद केले.
लोकांवर कडक नजर ठेवताना आता पोलिसांचेच आरोग्य धोक्यात येत आहे. आपल्याला कोरोना होईल का, आपल्यामुळे आपले कुटुंब बाधित होईल का, ही पोलिसांच्या ताणाची कारणे आहेत. भावनिक चढ-उतार, नैराश्य, शारीरिक आणि मानसिक थकवा अशा समस्या पोलिसांनाही जाणवत आहेत. यावर मात करण्यासाठी मग नकळत व्यसनाधिनतेकडे पावले वळत आहेत, असे मत काही मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले.
चौकट :
१. ताण कमी करण्याचे उपाय...
चिंता, उदासीनता, नैराश्य, झोप न येणे या समस्या वैद्यकीय कर्मचारी तसेच पोलिसांमध्ये वाढत आहेत. आपले कर्तव्य निभावताना पोलिसांचे नागरिकांशी, तर डॉक्टरचे रुग्णांच्या नातेवाईकांशी अनेकदा वाद होताना दिसतात. या वादांमुळेही डॉक्टर, पोलीस यांच्या तणावात भर पडते. वाढलेला ताण शारीरिक आणि मानसिक आजारांना निमंत्रण देत आहे. हा ताण कमी करण्याचा पहिला उपाय म्हणजे, ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत, त्यांच्यावर कमीत कमी वेळ घालविणे. यासोबतच सकारात्मक गोष्टी पाहणे आणि ऐकणे, आहार चांगला ठेवणे, नियमित व्यायाम, ध्यान आणि प्राणायाम करणे, लहान मुलांसोबत वेळ घालविणे याद्वारे मनावरचा ताण घालविता येईल.
- डॉ. रश्मीन आचलिया
मानसोपचारतज्ज्ञ
चौकट :
१. मानसिक आराेग्याबाबत सजग करण्याची गरज
लॉकडाऊन, संचारबंदी यामुळे पोलिसांच्याही कामाचे स्वरूप बदलले आहे. पोलिसांची संख्या कमी असल्याने त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताणही आहे. प्रत्येकवेळी चांगल्या कामाचे कौतूक होईलच असे नाही. यासोबतच कोरोनापासून स्वत:ला आणि कुटुंबाला सांभाळणे, राजकीय दडपणे, अशा सगळ्याच समस्या पोलिसांसमोर आहेत. यामुळे पोलिसांवरचा ताण, नैराश्य, चिंता यांचे प्रमाण वाढत चालले आहे. यातूनच पोलिसांच्या आत्महत्या होण्याची प्रकरणेही समोर येत आहेत. त्यामुळेच पोलिसांना तसेच डॉक्टर आणि नर्स यांनाही मानसिक आरोग्याबाबत सजग करून त्यांचे वेळोवेळी समुपदेशन करण्याची तसेच सकारात्मक मुकाबला कौशल्य, क्षमता बांधणीे ही सूत्रे अवलंबून त्यांना पुढील आव्हानांसाठी तयार करण्याची आज गरज आहे. योगा, शिथिलीकरण कौशल्ये, दीर्घ श्वसन, ध्यान यातून मानसिक शांतता मिळविण्याचा प्रयत्नही करावा.
- प्रा. अनघा पाटील