सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात जबरी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:48 IST2017-08-18T00:48:48+5:302017-08-18T00:48:48+5:30
घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व रोख असा साडेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. घनसावंगी तालुक्यातील मंगरुळ खरात गावात बुधवारी रात्री ही घटना घडली.

सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात जबरी चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
तीर्थपुरी : घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व रोख असा साडेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. घनसावंगी तालुक्यातील मंगरुळ खरात गावात बुधवारी रात्री ही घटना घडली.
मंगरूळ येथे रवींद्र श्रीधर देशमुख हे सेवानिवृत्त शिक्षक कुटुंबियांसोबत राहतात. १६ आॅगस्ट रोजी रात्री चोरट्यांनी त्यांच्या घरात वरून प्रवेश केला. या वेळी घरात झोपलेले देशमुख व त्यांच्या पत्नीला जाग आली.
तीन चोरट्यांनी दोघांना चाकूचा धाक दाखवत घरातील दहा तोळे सोने, चांदी व नगदी २५ हजार रुपये असा तीन लाख ४६ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
चोरट्यांनी येथीलच शिवाजी गोविंदराव राखुंडे यांच्याही घरातील नगदी व सोने मिळून दहा हजारांचा ऐवज चोरून नेला. या ठिकाणी श्वानपथक, ठसे तज्ज्ञांचे पथक दाखल झाले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सोनवणे, अंबडचे सहायक निरीक्षक सोने, गुन्हे शाखेचे घुसिंगे, गोलिवार, सपोनि दत्तात्रय मदन, कॉन्स्टेबल भगवान शिंदे यांनी पाहणी केली. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.