महिलेला विष पाजून दागिण्यांची चोरी
By Admin | Updated: August 10, 2015 00:58 IST2015-08-10T00:54:18+5:302015-08-10T00:58:14+5:30
लातूर : लातूर शहरानजीक असलेल्या महापूर गावात एका महिलेस विष पाजून तिच्या अंगावरील चार तोळ्यांचे दागिने चोरुन चोरट्याने पोबारा केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली.

महिलेला विष पाजून दागिण्यांची चोरी
लातूर : लातूर शहरानजीक असलेल्या महापूर गावात एका महिलेस विष पाजून तिच्या अंगावरील चार तोळ्यांचे दागिने चोरुन चोरट्याने पोबारा केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. या प्रकरणी पतीच्या फिर्यादीनुसार रेणापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
लातूर शहरानजिक असलेल्या महापूर गावात शुक्रवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घरी कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी एका महिलेला विष पाजले. बेशुद्ध झालेल्या महिलेच्या अंगावरील चार तोळ्यांचे दागिने काढून घेतले. दागिण्यांमध्ये नेकलेस, झुमके, मणी मंगळसूत्र असे एकूण चार तोळ्यांचे दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. घराशेजारी कोणीही नव्हते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास लातूर येथे कामाला असलेल्या पतीने घरी फोन केला. मात्र फोन उचलला गेला नाही. वारंवार फोन केला. परंतु, प्रतिसाद मिळाला नसल्याने सायंकाळी गावाकडे गेल्यानंतर पत्नी बेशुद्ध असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ पत्नीला लातूरच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्याही ती महिला बेशुद्धच आहे. याबाबत पती शिवकुमार भंगे यांनी रेणापूर पोलिसात फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेणापूर पोलिसांनी घटनास्थळी व रुग्णालयात जाऊन पाहणी केली असून, तपासासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले असल्याचे रेणापूर पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
विष पाजून चार तोळे सोन्याचे दागिने घेऊन चोरट्याने पोबारा केल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली़ दरम्यान, सदरील महिलेला उपचारासाठी लातूरच्या एमआयटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, सदरील महिला मृत्यूशी झुंज देत आहे. प्रकृती गंभीर असल्याने नातेवाईक चिंतेत आहेत. शुक्रवारी घटना घडूनही पोलिसांत गुन्हा मात्र रविवारी दाखल झाला. महापुरात सध्या या घटनेमुळे भीतीचे वातावरण आहे.