चोरीच्या पैशांतून घर, हॉटेल, एफ.डी.
By Admin | Updated: September 8, 2015 00:37 IST2015-09-08T00:21:48+5:302015-09-08T00:37:53+5:30
औरंगाबाद : रामनगर येथील स्टेट बँक आॅफ हैदराबादच्या एटीएममधील २३ लाख ५ हजार ९०० रुपये चोरणाऱ्या चोरट्यास मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली.

चोरीच्या पैशांतून घर, हॉटेल, एफ.डी.
औरंगाबाद : रामनगर येथील स्टेट बँक आॅफ हैदराबादच्या एटीएममधील २३ लाख ५ हजार ९०० रुपये चोरणाऱ्या चोरट्यास मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी त्यास संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरलेल्या रकमेतून घर खरेदी केल्याचे आणि बँकेत दहा लाख रुपये फिक्स डिपॉझिट ठेवल्याचे सांगितले.
किरण वाघमारे (२७,रा. एकनाथनगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याने तीन महिन्यांपूर्वी एकनाथनगरमध्ये घर खरेदी केल्याची व विभागीय क्रीडा संकुलाजवळ हॉटेल सुरू केल्याची गुप्त माहिती मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हा अन्वेषण पथकाचे प्रमुख कल्याण शेळके यांना मिळाली. त्याची घरची परिस्थिती हलाखीची असल्याचेही त्यांना समजले. पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने १७ जून रोजी रामनगर येथील एटीएम मशीनच्या कोड वर्डचा वापर करून ही रक्कम पळविल्याची कबुली दिली. तो १७ एप्रिल २०१५ पर्यंत सेक्युरिटी ट्रान्स इंडिया लिमिटेड या कंपनीकडे कस्टोडियन म्हणून नोकरीला होता. ही कंपनी विविध बँकांच्या एटीएम मशीनमध्ये रोख रक्कम ठेवण्याचे काम करते. रक्कम ठेवण्यासाठी कस्टोडियनला एक पासवर्ड दिला जातो. या पासवर्डचा वापर केल्यानंतरच एटीएम मशीनची तिजोरी उघडते. दरम्यान, १७ एप्रिल रोजी त्याने नोकरी सोडली. व्यवसाय करण्याचा निर्णय त्याने घेतला. त्याला घरही खरेदी करायचे होते. यासाठी त्याने एटीएम मशीनमधून रक्कम चोरण्याचा निर्णय घेतला. १७ जून रोजी पहाटे सुरक्षारक्षक नसलेले रामनगर येथील एटीएम सेंटर गाठले. पासवर्डचा वापर करून एटीएमची तिजोरी उघडली. त्यावेळी तिजोरीतील रोख २३ लाख ५ हजार ९०० रुपये घेऊन एटीएम मशीन बंद करून तो निघून गेला.
किरणने चोरीच्या रकमेतून एकनाथनगर येथे साडेबारा ते तेरा लाखांचे घर खरेदी केले.
४त्यानंतर उर्वरित रकमेपैकी दहा लाख रुपये परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील एका बँकेत फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवले.
४ शिवाय बँकेकडून त्याने तीन लाख रुपये कर्ज घेतले. पोलिसांनी सात लाख रुपये जप्त केले आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक नाथा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार कल्याण शेळके, शेख हारुण, हेडकॉन्स्टेबल राजेश बनकर, सुनील जाधव, शोन पवार, अशोक खिल्लारे यांनी केली.