शहराच्या मध्यवर्ती भागातील हॉटेल मध्ये चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 19:03 IST2017-09-03T18:49:21+5:302017-09-03T19:03:57+5:30
शहराच्या मध्यभागी असलेल्या औरंगपूरा येथील इंद्राली हॉटेलवर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही चोरी गणेशोत्सवादरम्यान घडली.

शहराच्या मध्यवर्ती भागातील हॉटेल मध्ये चोरी
औरंगाबाद, दि.3 : शहराच्या मध्यभागी असलेल्या औरंगपूरा येथील इंद्राली हॉटेलवर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही चोरी गणेशोत्सवादरम्यान घडली. चोरट्यांनी हॉटेलमधून रोख 16 हजार व सीसीटीव्ही कॅमेर्याचे डीव्हीआर साहित्य असा जवळपास 30 हजारांचा ऐवज चोरला. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, किशोर राजू शेट्टी (रा. बन्सीलाल नगर) यांचे औरंगपूरा परिसरात इंद्राली हॉटेल आहे. त्यांनी नेहमी प्रमाणे शनिवार रोजी रात्री 12 वाजता हॉटेल बंद करून घरी गेले. दोन दिवस बॅक बंद असल्याने हॉटेल मधे आलेले दिवसभरातील 15 ते 16 हजार रूपये रक्कम गल्यातच ठेवले होते. रविवार रोजी सकाळी दुध देण्यासाठी दुधवाला आला असता हॉटेल मध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्याने तात्काळ घटनेची माहिती हॉटेल मालक किशोर शेट्टी यांना फोनद्वारे दिली. किशोर शेट्टी यांनी तात्काळ हॉटेल वर येत हॉटेलची पाहणी केली असता, रोख रक्कमेसह सीसीटीव्हीचे डीव्हीआर चोरीला गेल्याचे समजले. किशोर यांनी घटनेची माहिती सिटीचौक पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत कदम व पोलिस कर्मचार्यांनी घटना स्थळाची पाहणी केली.