औरंगाबाद: शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, टंचाईमुळे त्रस्त झालेल्या महिला आज सकाळी ६ वाजता पुंडलिक नगर जलकुंभावर धडकल्या. दुषित पाणी, कमी दाब यामुळे संतप्त महिलांनी थेट जलकुंभावर जाऊन आंदोलन केले.टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा घोटाळा, दुषित पाणी, अनियमित वेळा, कमी दाबाने पुरवठा अशा समस्यांनी सध्या शहरवासीय त्रस्त आहेत.
शहरातील पुंडलिकनगर भागातील अनेक वस्त्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच पिण्यासाठी पुरवठा होणारे पाणी दूषित असल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप आहे. त्यामुळे अखेर आज सकाळी ६ वाजता ( गुरुवारी ) पुंडलिकनगर भागातील महिला आणि नागरिकांनी पाणीच्या टाकीवर धडक देत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात महिलांचा मोठ्याप्रमाणात सहभाग होता. तसेच अनेक भाजपचे पदाधिकारी सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले होते.
शहरात पाणी प्रश्न गंभीरसंतप्त महिलांनी गेटवरील कुलूप दगडाने तोडले आणि त्यानंतर जलकुंभाच्या परीसरात जाऊन ठिय्या आंदोलन सुरू केले. तर काही नागरिक पाण्याच्या टाकीवरती जाऊन घोषणाबाजी करून लागले.दिवसेंदिवस शहरातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच सिडको येथील जलकुंभावर नागरिकांनी आंदोलन केले होते. त्याशिवाय महापालिकेच्या टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचा घोटाळा देखील लोकमतने उघडकीस आणला आहे.