छत्रपती संभाजीनगर : अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तस्करांची शहरातून धिंड काढण्याचा पॅटर्न पोलिसांनी गुरुवारी कायम ठेवला. चरस विक्रीत पकडलेल्या पाच आरोपींपैकी चार जणांची मुकुंदवाडी पोलिसांनी जिन्सी परिसरातून धिंड काढली. शिवाय त्यांच्या घराची झाडाझडती घेतली.
गणेशोत्सवात नशेखोरांना चरस विक्री करण्यासाठी मुकुंदवाडीतील अंबिकानगरात आलेल्या मोहंमद मुज्जमील मोहंमद नजीर (३४), लोमान ऊर्फ नोमान खान इरफान खान (२१, दोघेही रा. रहेमानिया कॉलनी), मोहंमद लईखुद्दीन मोहंमद मिराजोद्दीन (२५, रा. रहीमनगर), शेख रेहान शेख अशपाक (१९, रा. कटकट गेट) आणि शेख सुलताना शेख मैनोद्दीन या टोळीला अटक केली. त्यांच्या ताब्यातून दीड किलो चरस जप्त करण्यात आले होते. या सर्व टोळीला मध्य प्रदेशमधून चरस व इतर अमली पदार्थांचा पुरवठा होत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी जेथून चरस विक्री करतात, तेथेच चारही आरोपींची मुकुंदवाडी पोलिसांनी हातकडीसह धिंड काढली. नातेवाईक, मित्रांसमोर हातकडीसह चालताना आरोपींची मान शरमेने खाली गेली होती. पोलिस निरीक्षक सचिन इंगोले, सहायक निरीक्षक संजय बहुरे, गुन्हे शाखेचे विनायक शेळके, अंमलदार नरसिंग पवार, बाबासाहेब कांबळे, गणेश वैराळकर, अनिल थोरे, गणेश वाघ यांनी आझाद चौक, रहेमानिया कॉलनी, रहिमनगर या भागातून त्यांना फिरवले.
मुज्जमील फायनान्स करायचाया टोळीला परराज्यातून अमली पदार्थ मागवण्यासाठी बऱ्याचदा आगाऊ रक्कम देणे बंधनकारक असायचे. त्यासाठी मुज्जमील आधी पैसे लावायचा.त्याच्या परताव्यात तो त्यांच्याकडून टक्केवारीवर व्याज वसूल करीत होता. चरससह ते अन्य अमली पदार्थांचीदेखील तस्करी करीत होते. विशेष म्हणजे, तीन वर्षांपासून हे या रॅकेटमध्ये सक्रिय असल्याचे पोलिसांनी सांगितले.