छत्रपती संभाजीनगर : महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या कुख्यात आरोपीसह त्याच्या एका सहकाऱ्यास जवाहरनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या आरोपींनी शहरातील जवाहरनगर, पुंडलिकनगर आणि उस्मानपुरा पोलिस ठाण्यात दाखल ११ गुन्ह्यांची कबुली दिली. या आरोपींकडून तब्बल १२७ ग्रॅम म्हणजेच जवळपास १३ तोळे सोन्याची मंगळसूत्रे आणि दोन चोरीच्या दुचाकी जप्त केल्याची माहिती परिमंडळ -२ चे पोलिस उपायुक्त नवनीत काँवत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे उपस्थित होते.
४५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुन्हेगार अमोल वैजनाथ गलाटे (३०, रा. इंदिरानगर, गारखेडा परिसर) आणि त्याचा सहकारी मंगेश वाल्मीक शहाणे (१८, रा. पैठण) या दोघांना अटक केली. डीसीपी काँवत यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील महिन्यात मीनल देशपांडे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून पोबारा केला होता. हा गुन्हा अमोलने केल्याचे सीसीटीव्हीच्या तपासणीत दिसले. पोलिस अंमलदार मारोती गोरे यांना अमोल हा आईला भेटण्यासाठी जालना येथे येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार जवाहरनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे यांनी उपनिरीक्षक मारोती खिल्लारे, सहायक उपनिरीक्षक गजेंद्र शिगाने, हवालदार क्षीरसागर, बनकर व मारोती गोरे यांचे पथक जालना येथे पाठवले. तोपर्यंत आरोपींना जालना पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे जवाहरनगर पोलिसांनी न्यायालयासोबत पत्रव्यवहार करून अमोल व मंगेश यांचा जालना कारागृहातून कायदेशीर ताबा घेतला. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या चौकशीत जवाहरनगर पोलिसांच्या हद्दीतील ७, पुंडलिकनगर व उस्मानुपरा ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी दोन, अशा ११ गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपींकडून १२७ ग्रॅम सोने आणि दोन दुचाकी, असा ९ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस उपायुक्त नवनीत काँवत, सहायक आयुक्त रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनात केली.
एमपीडीएअंतर्गत कारवाई होणारअमोलविरोधात तब्बल ४५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही त्याच्यावर एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली होती. आताही प्रत्येक गुन्ह्यात स्वतंत्र अटक केल्यानंतर शेवटी एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात येईल. त्यासाठीचा प्रस्ताव आतापासूनच तयार केला जाणार असल्याचेही डीसीपी नवनीत काँवत यांनी सांगितले.