छत्रपती संभाजीनगर : किरकोळ कारणावरून ३९ वर्षीय तरुणाची एका नशेखोराने विनाकारण चाकूने भाेसकून हत्या केली. बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास हर्षनगरात ही धक्कादायक घटना घडली. रणजित सुधाकर दांडगे असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे मात्र शहरातील वाढत्या नशेखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला.
टी.व्ही. सेंटर परिसरात राहणारे रणजित दांडगे नारेगावातील एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. त्यांच्या सासुरवाडीकडील कुटुंबात वाढदिवस असल्याने ते बुधवारी सायंकाळी ८ वाजता कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. साधारण ९ वाजेच्या सुमारास ते परिसरातीलच दुकानात पायी जात असताना हल्लेखोर आरोपीने त्यांना नाहक हटकले. रणजित यांनी त्याच्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले. मात्र, हल्लेखोराने नाहक वाद वाढवून आरडाओरड करत त्यांचा पाठलाग करत सुटला. काही अंतरावर जात त्याने थेट चाकू काढून रणजित यांच्या थेट छातीवर वार केला. यात रणजित रक्ताच्या थारोळ्यात पडले. जवळच राहणाऱ्या नातेवाइकांनी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, छातीत खोलवर वार झाल्याने रणजित यांचा तोपर्यंत मृत्यू झाला होता. रणजित यांना पत्नी, तीन मुले आहेत.
चोरीचे गुन्हे, तरर्र नशेतघटनेची माहिती कळताच निरीक्षक निर्मला परदेशी, दिलीप चंदन, उपनिरीक्षक अजित दगडखैर यांनी धाव घेतली. चंदन, दगडखैर यांनी तत्काळ पिल्या नामक हल्लेखोराचा शोध घेऊन ठाण्यात नेले. नशेत असल्याने तेथेही तो आरडाओरड करत होता. रात्री उशिरापर्यंत हल्लेखोराच्या वयाची खातरजमा करणे सुरू होते. दरम्यान, त्याच्यावर अल्पवयीन असतानाचा एक चोरीचा गुन्हा दाखल आहे.
थम्पअप कोणाला केले ?हल्लखोर नशेच्या आहारी गेलेला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. घटनेच्या वेळी त्याने गोळ्यांची नशा केल्याचा संशय आहे. रणजित यांच्या छातीत खुपसल्यानंतर ते कोसळताच हल्लेखोराने थम्प अप म्हणजेच हात वर करुन अंगठा दाखवत होता, असेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.