ठाण्यात डांबून जबर मारहाण
By Admin | Updated: October 27, 2015 00:23 IST2015-10-27T00:17:51+5:302015-10-27T00:23:06+5:30
कळंब : सोयाबीन चोरी प्रकरणाच्या चौकशीसाठी म्हणून ताब्यात घेतलेल्या चौघांना पोलिस ठाण्यात डांबून तिघा पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार

ठाण्यात डांबून जबर मारहाण
कळंब : सोयाबीन चोरी प्रकरणाच्या चौकशीसाठी म्हणून ताब्यात घेतलेल्या चौघांना पोलिस ठाण्यात डांबून तिघा पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार सोमवारी कळंब न्यायालयात दाखल करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वाशी तालुक्यातील मांडवा येथील कैलास सूर्यभान डोईफोडे (वय ३०) हे २४ आॅक्टोबर रोजी सारोळा मांडवा येथील बसस्थानकावर थांबले असता कळंब पोलिस ठाण्यातील तीन कर्मचारी त्यांच्याकडे आले. त्यांनी एका गुन्ह्यातील चौकशीसाठी आमच्यासोबत चला, असे म्हणून डोईफोडे यांना सोबत घेतले. तसेच गावातीलच हनुमंत विष्णू दराडे यांना राहत्या घरातून तर गोकुळ भीमराव डोईफोडे यांना बसस्थानकावरून गुन्ह्याच्या चौकशीसाठी म्हणून ताब्यात घेतले. या तिघांना कळंब पोलीस ठाण्यात रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास आणले. तसेच कळंब तालुक्यातील भोगजी येथील उत्रेश्वर रामकिसन खराटे यांनाही या तिघांसोबत ठाण्यातील खोलीमध्ये डांबण्यात आले. काही वेळाने या तिन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी कोणतीही चौकशी न करता चौघांना टायर कोलच्या पट्याने मारहाण करण्यास सुरूवात केली, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या मारहाणीत चौघांनाही चांगलाच मार लागला असून, या मारहाणीचे व्रणही या चौघांच्या अंगावर स्पष्टपणे दिसत आहेत.
दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल आहे काय? त्या चौघांना अटक का केली, अशी विचारणा करण्यासाठी गेलेल्या या पिडीत कुटुंबियांना तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिकांनाही पोलिसांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तसेच पोलिसांनी भोगजी येथे सोयाबीन चोरी झाली असून, तो गुन्हा तुम्ही कबूल करा, असे म्हणून पुन्हा मारहाण केली. जबरीने मारहाण करून घेतलेल्या गुन्ह्याची कबुलीही पोलिसांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्र्डींग केली असून, तब्बल २७ ते २८ तास डांबून पोलिसांनी अखेर २५ आॅक्टोबर रोजी रात्री १२ वाजता या चौघांना स्थानकाबाहेर काढल्याचे न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. (वार्ताहर)