ठाण्याला लागली गळती
By Admin | Updated: June 29, 2016 01:02 IST2016-06-29T00:25:24+5:302016-06-29T01:02:09+5:30
वडोदबाजार : येथील पोलीस ठाण्याची इमारत जीर्ण झाल्याने पहिल्याच पावसात गळू लागली आहे. त्यामुळे ठाण्यातील बहुतेक महत्त्वाची कागदपत्रे भिजली आहेत.

ठाण्याला लागली गळती
वडोदबाजार : येथील पोलीस ठाण्याची इमारत जीर्ण झाल्याने पहिल्याच पावसात गळू लागली आहे. त्यामुळे ठाण्यातील बहुतेक महत्त्वाची कागदपत्रे भिजली आहेत. त्यामुळे हे पोलीस ठाणे आता गावापासून ५ कि.मी. अंतरावर स्थलांतरित झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी (दि.२२) आणि शुक्रवारी (दि.२४) झालेल्या जोरदार पावसाने अक्षरश: पोलीस ठाण्याला जणू पावसाच्या धारा लागल्या होत्या. त्यामुळे ठाण्यात पाणीच पाणी साचले होते. त्यामुळे पोलीस प्रशासनाने पर्यायी व्यवस्था म्हणून नवीन पोलीस ठाण्यात स्थलांतर झाले आहे. वडोदबाजार येथील पोलीस ठाणे निजामकालीन असून याअंर्तगत फुलंब्री व सिल्लोड तालुक्यांतील ५७ गावे येतात.
बुधवारी झालेल्या पावसामुळे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्याला लागलेल्या गळतीचा अनुभव आला. दरम्यान, गत दोन वर्षांपूर्वी वडोदबाजार पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे काम औरंगाबाद- जळगाव महामार्गालगत असलेल्या खामगाव फाट्याजवळील महालकिन्होळ्याच्या गायरान जमिनीवर झाले आहे. या ठिकाणी प्रशासनाने जवळपास १० एकर जागा पोलीस ठाण्यासाठी दिली आहे. बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतीत पर्यायी व्यवस्था म्हणून पोलिसांनी जागा शोधली आहे.
पोलीस ठाण्यात जमा असलेल्या गुन्ह्यातील व विविध अपघातांतील वाहने स्थलांतर करण्याचे काम सुरू झाले आहे. विशेष म्हणजे वडोदबाजार येथे असलेल्या पोलीस वसाहतीची दुरवस्था झाली. या ठिकाणी कोणीही पोलीस कर्मचारी वास्तव्य करीत नसल्याने पोलीस कॉलनी भकास झाली असून, पूर्णपणे मोडकळीस आली आहे.