निराधारांनी मांडले तहसीलमध्ये ठाण
By Admin | Updated: June 3, 2014 00:42 IST2014-06-03T00:32:04+5:302014-06-03T00:42:17+5:30
पालम : तालुक्यातील खडी येथील शेतकरी व निराधारांनी विविध न्याय मागण्यांसाठी तहसील कार्यालयात २ जून रोजी दुपारी १२ वाजता ठाण मांडून आंदोलन केले़

निराधारांनी मांडले तहसीलमध्ये ठाण
पालम : तालुक्यातील खडी येथील शेतकरी व निराधारांनी विविध न्याय मागण्यांसाठी तहसील कार्यालयात २ जून रोजी दुपारी १२ वाजता ठाण मांडून आंदोलन केले़ तहसीलदार कैलास वाघमारे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे़ पालम तालुक्यातील खडी येथे संजय गांधी निराधार योजनेपासून अनेक लाभार्थी वंचित आहेत़ या लाभार्थ्यांनी अनुदानाच्या यादीत नाव समाविष्ट करावे, यासाठी दोन महिन्यांपूर्वी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते़ परंतु, प्रशासनाकडून अजूनही अनुदानाच्या यादीत लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करण्यात आलेली नाहीत़ यामुळे अनेक जण आर्थिक संकटात सापडले आहेत़ निराधारांच्या न्याय्य मागण्यांसाठी निराधार मंडळींनी तहसील कार्यालय गाठत कैफियत मांडली़ तसेच खडी येथील अनेक शेतकरी गारपिटीच्या अनुदानापासून वंचित आहेत़ गारपिटीमुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत़ शासकीय यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे करून अनुदानासाठी पात्र शेतकर्यांच्या याद्या तयार केल्या आहेत़ या याद्यामध्ये अनेक शेतकर्यांची नावे समाविष्ट करण्यात आलेली नाहीत़ शेतकरी यामुळे अनुदानापासून दूर जाणार आहेत़ निसर्गाच्या संकटाचा सामना करणार्या शेतकर्यांपुढे प्रशासनाने अडचणी निर्माण केल्या आहेत़ यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्यांनी निराधार मंडळींसह तहसील कार्यालयात ठाण मांडले़ मागण्या मान्य करेपर्यंत तहसीलदारांच्या कक्षामधून उठणार नसल्याचा इशारा देऊन आंदोलन सुरू करण्यात आले होते़ अखेर निराधार व शेतकर्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले़ या आंदोलनात उपसरपंच विशाल दादेवाड, सभापती श्रीकांत वाडेवाले, संदीप आळनुरे, एकनाथ दिवटे, शिवाजी अकनगिरे, भारत करंडे, माधव तिनाटे, उत्तम बोबडे, तुकाराम निळे, विठ्ठल खंदाडे आदींसह शेकडो निराधार व शेतकरी सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)पालम तालुक्यात निराधारांवर यादीतून नावे वगळण्यात आल्याने उपासमारीची वेळ आलेली आहे़ प्रशासकीय यंत्रणा हालचाली करीत नसल्याने पात्र असूनही लाभार्थी योजनेपासून वंचित राहत आहेत़ यामुळे गावोगावचे निराधार एकत्र येऊन तहसील कार्यालय गाठत तहसीलदारांच्या कक्षात ठाण मांडण्याची ही दुसरी घटना आहे़ यापूर्वी पारवा येथील निराधारांनीही ठाण मांडून आक्रमक पवित्रा घेतला होता़ यामुळे शासकीय यंत्रणेने वेगवान हालचाली करीत पात्र लाभार्थ्यांना न्याय देण्याची गरज आहे़ पालम तालुक्यात तहसील कार्यालयाने सुक्ष्म तपासणीच्या नावाखाली गोरगरिबांवर अन्याय केलेला आहे़ अनेक पात्र लाभार्थी यादीतून वगळण्यात आले आहेत़ यामुळे गोरगरीब निराधार मंडळींना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे़ निराधार व वयोवृद्ध मंडळींनी तहसील कार्यालयात तक्रारी दिल्या आहेत़ परंतु, या तक्रारींची दखल घेण्यात आलेली नाही़ यामुळे तहसील कार्यालय गाठत तालुक्यातील निराधार मंडळी आक्रमक होताना दिसत आहेत़