अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:53 IST2017-07-22T00:51:26+5:302017-07-22T00:53:44+5:30
नांदेड: गत चार महिन्यांपासूनचे थकित मानधन देऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांची उपासमार थांबवावी, या मागणीसाठी शुक्रवारी काढलेल्या थाळीनाद मोर्चाने जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला होता़

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: गत चार महिन्यांपासूनचे थकित मानधन देऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांची उपासमार थांबवावी, या मागणीसाठी शुक्रवारी काढलेल्या थाळीनाद मोर्चाने जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला होता़
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने थाळीनाद मोर्चा काढून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले़ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यापासून मानधन दिले नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे़ थकित मानधन त्वरित द्यावे, मानधनवाढ समितीने मानधनवाढीसंबंधी शिफारशी शासनाकडे सादर केल्या आहेत़ त्या मंजूर करून मानधनात वाढ करावी, ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांना खाण्यायोग्य आहार देण्यात यावा, लाभार्थींच्या आहारात वाढ करावी, जिल्ह्यातील शेकडो कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे़ मात्र त्या कर्मचाऱ्यांना सेवासमाप्ती लाभाची रक्कम मिळाली नाही, ती रक्कम तातडीने द्यावी, मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीचा फरक द्यावा, रिक्त जागेवर सेविका, मदतनीसची नेमणूक करावी, सहा महिन्यानंतरही २०१७ चे परिवर्तन निधीचे पैसे अंगणवाडी केंद्राला दिले नाहीत, त्यामुळे अंगणवाडीसेविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ या कर्मचाऱ्यांचे परिवर्तन निधीचे पैसे द्यावे इ. मागण्या यावेळी करण्यात आल्या़
दरम्यान, शुक्रवारी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी हातात थाळी घेत जिल्हा परिषदेसमोर घोषणाबाजी केली़ मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या कार्याध्यक्षा मंगला सराफ, शततारका काटफाडे, अश्विनी महल्ले, वंदना पवार, सुमित्रा जाधव, अनूसया नवसागरे, लाभसेटवार, कविता जाधव, सत्वशीला पंडित, कमल भगत, शकुंतला कोसलगे, कंधारकर यांनी केले़