ठाकरेंचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ रखडला!
By Admin | Updated: November 27, 2014 01:09 IST2014-11-27T00:59:49+5:302014-11-27T01:09:22+5:30
औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्रहालय सिद्धार्थ उद्यान परिसरात बांधण्यात येत आहे.

ठाकरेंचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ रखडला!
औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्रहालय सिद्धार्थ उद्यान परिसरात बांधण्यात येत आहे. त्याचे काम रखडल्यामुळे काल २५ रोजी ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. पक्षनेते सुभाष देसाई यांना त्या संग्रहालयाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी काल २५ रोजी सांगितले होते. त्यावरून देसाई यांनी बुधवारी सायंकाळी काही स्थानिक नेत्यांना घेऊन संग्रहालयाच्या कामाची पाहणी केली.
संग्रहालयाच्या कामामुळे आणि संघटनेतील गटबाजीमुळे आज समर्थनगर प्रचार कार्यालयात तातडीची बैठक घेण्यात आली. पालिकेतील पदाधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवीत देसाई यांनी स्वत: त्या कामाचा आढावा घेतला.
महापौर कला ओझा, सभागृह नेते किशोर नागरे, सभापती विजय वाघचौरे, गटनेते गजानन बारवाल यांच्यासह नगरसेवकांनी त्या कामाचा योग्य पाठपुरावा केलेला नाही, असा वरिष्ठ नेत्यांचा समज आहे.
२०१० साली पक्षाने दिलेल्या वचननाम्यात त्या संग्रहालयाच्या कामाचा उल्लेख होता. २०१५ ची निवडणूक तोंडावर आली असून त्याचे काम अजून संपलेले नाही. त्यामुळे पक्षप्रमुख ठाकरे यांनी स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
तीन वर्षांपासून संग्रहालयाचे काम सुरू असून सिव्हिल काम पूर्ण झाले आहे. इतिहास संकलनाचे काम रखडले आहे. ५ कोटी रुपयांच्या आसपास त्या संग्रहालयाचा खर्च आहे. ४
मराठवाड्यातील मुक्तिसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतींचा ठेवा म्हणून ते संग्रहालय बांधण्याचा ठाकरेंचा संकल्प आहे. सैनिकांचा इतिहास, त्यांचे कार्य, छायाचित्रांसह तेथे भावी पिढीला पाहावयास मिळावा, हा त्या मागील उद्देश आहे. मनपाने स्वातंत्र्यसैनिकांबाबतचे साहित्य, माहिती संकलनासाठी आवाहन केले. त्यावरून काही स्वातंत्र्यसैनिकांनी मनपाशी संपर्क केला; परंतु पालिकेने काहीही प्रतिसाद दिला नाही.
मनपाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे स्वातंत्र्यसैनिकांनी थेट उद्धव ठाकरेंना फोन करून अवमान होत असल्याची भावना व्यक्त केली. एकतर संग्रहालयाच्या कामाला विलंब, त्यात स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान झाल्यामुळे ठाकरे संतापले.