उसाकडे पाठ; दहा लाख रोपे पडून

By Admin | Updated: July 18, 2016 01:04 IST2016-07-18T00:45:38+5:302016-07-18T01:04:30+5:30

उमरगा : तालुक्यातील कलदेव लिबाळा, तुगाव, माडज, जकेकूर, बेळंब आदी भागातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर उसाची रोपे तयार केली.

Texture to sugarcane; One million plants fall | उसाकडे पाठ; दहा लाख रोपे पडून

उसाकडे पाठ; दहा लाख रोपे पडून


उमरगा : तालुक्यातील कलदेव लिबाळा, तुगाव, माडज, जकेकूर, बेळंब आदी भागातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर उसाची रोपे तयार केली. मात्र, पुरेशा पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांनी तयार केलेल्या ऊसरानातील सरी मोडून खरिपाची पेरणी केली आहे. उसाच्या रोपाला मागणी नसल्याने तयार रोपांचे काय करायचे, झालेला खर्च कसा काढायचा, असे अनेक प्रश्न या शेतकऱ्यांसमोर सध्या उभे आहेत.
मागील तीन वषार्पासून सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील ऊसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. हे लक्षात घेऊन मुरुम येथील विठ्ठलसाई कारखान्याने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना जुनमध्ये उसाची रोपे देण्याचा निर्णय घेतला. कार्यक्षेत्रातील ज्या शेतकऱ्यांकडे शेडनेट व पाणी उपलब्ध आहे त्यांनी ऊसाची रोपे तयार करण्याचे आवाहनही कारखान्याच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील कलदेव लिंबाळा येथील सुनील जकेकुरे यांच्यासह गिरजाप्पा बिराजदार (तुगाव) यांनी तीन लाख, सिताराम मारेकर (माडज) यांनी १ लाख, अविनाश थिटे (जकेकूर), विजय पाटील (बेळंब) यांनी प्रत्येकी दीड लाख तर अनिल बिराजदार (बेळंब) यांनी पन्नास हजार रोपांची निर्मिती केली. सुनील जकेकुरे यांनी आपल्या शेतात दीड लाख रुपये खर्च करून २८ गुंठ्यावर एप्रिल २०१६ मध्ये शेडनेटची उभारणी केली. त्यानंतर लागवडीसाठी लागणारे दीड बाय दोन फुटाचे ७० रोपे येणारे ट्रे व कोकोपीट खरेदी केले. जवळपास बेणे उपलब्ध होत नसल्याने उमरगा, लोहारा, तुळजापूर, औसा व अक्कलकोट या तालुक्यातील मिळेल त्या गावातून त्यांनी ऊसबेणे खरेदी केले. यासाठी स्वत:च्या गावातील व परिसरातील काळा लिंबाळा, कोराळ आदी गावातील मजूर लावून साडेपाच लाखापेक्षा जास्त खर्च करून तंत्रशुध्द पध्दतीने तब्बल तीन लाख रोपे तयार केली. परिसरातील शेतकऱ्यांना जवळपास उत्तम प्रतिची रोपे मिळतील व आपणालाही यातून आर्थिक मदत होईल, अशी या शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, संपूर्ण जून महिन्यात एकही दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे कोणाच्याही विहिरीला अथवा बोअरवेलला पाणी आले नाही. परिणामी पुरेशा पावसाअभावी शेतकऱ्यांनीही उसाच्या सरी मोडून खरिपाची पेरणी करणे पसंत केल्याने रोपांना मागणी नाही. तयार केलेली ही रोपे पडून असल्याने शेतकरी धास्तावला आहे. (वार्ताहर)

Web Title: Texture to sugarcane; One million plants fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.