कृषी विमा योजनेस जुलअखेरपर्यंत मुदत
By Admin | Updated: July 10, 2014 01:00 IST2014-07-10T00:24:16+5:302014-07-10T01:00:01+5:30
उस्मानाबाद : केंद्र शासनाने सुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजना पुन्हा राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली.

कृषी विमा योजनेस जुलअखेरपर्यंत मुदत
उस्मानाबाद : राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत हवामान आधारित पीक विमा योजना राबविण्यात आली. मात्र जुन जुलैच्या पावसाची वाट पाहण्याअगोदरच योजनेची मुदत संपल्याने शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळवता आला नाही. त्यामुळे केंद्र शासनाने सुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजना पुन्हा राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली.
राष्ट्रीय पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०१४ पीक विमा ही योजना सर्व पिकांसाठी ऐच्छिक केली असून, कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता चलनाद्वारे बँकेत भरणे आवश्यक आहे. चालू हंगामात कर्ज वितरण राष्ट्रीयकृत बँकेकडून करण्यात आल्याने पीक विमा हप्ता शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत भरून आपले पीक संरक्षित करावे, असे आवाहनही कृषी अधिकारी तोटावार यांनी केले आहे.
या योजनेमध्ये ६० ते ८० टक्के जोखीमस्तर ठेवण्यात आला आहे. पिकानुरुप दर हेक्टरी १३ हजार ते २ लाख ४२ हजारापर्यत विम्याचे संरक्षण कवच पिकांना लाभणार आहे. सोमवार ७ जुलै पासून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वीच्या योजनेत वंचित असलेल्या शेतक-यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे.
या योजनेत ज्वारी, बाजरी, मका, उडीद, मूग, तूर, भुईमूग, तीळ, सोयाबीन, सूर्यफूल, कापूस व कांदा या पिकांचा समावेश केला आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांनी बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना ज्या पिकाचा विमा उतरवयाचा आहे ते पीक शेतात पेरल्याबद्दल तलाठ्याचा पीक पेऱ्याचा दाखला, सातबारा आणि आठ अ च्या उताऱ्यासह नजीकच्या बँकेत हप्ता भरावा. या योजनेअंतर्गत अति अल्प व अल्प भूधारकांना विमा हप्त्याच्या १० टक्के सूट असून, त्यांनी विमा हप्त्यावरील दराच्या ९० टक्के प्रमाणे भरणा करावयाचे आहे. खरीप हंगामाकरिता उंबरठा उत्पादनाच्या किमंतीपर्यंत व उंबरठा उत्पादनापेक्षा जादा किमंतीपर्यंत प्रति हेक्टरी दिलेल्या रकमेवर पीक विमा हप्ता शेतकऱ्यांनी तातडीने भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असेही कृषी विभागाने कळविले आहे. (प्रतिनिधी)