क्षणाक्षणाला ताणली कार्यकर्त्यांची उत्सुकता
By Admin | Updated: March 21, 2017 23:55 IST2017-03-21T23:45:35+5:302017-03-21T23:55:56+5:30
बीड कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याची कार्यकर्त्यांना प्रचंड उत्सुकता होती.

क्षणाक्षणाला ताणली कार्यकर्त्यांची उत्सुकता
राजेश खराडे बीड
कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याची कार्यकर्त्यांना प्रचंड उत्सुकता होती. सकाळी ११ वाजल्यापासूनच सामाजिक न्याय भवन परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
राष्ट्रवादी व भाजपकडून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी नेमकी कोणाची नावे निश्चित झाली यावरूनही बराच वेळ गोंधळ होता. ऐनवेळी युधाजित पंडित यांचे नाव मागे पडले. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली.
दुसरीकडे, शिवसंग्रामच्या जयश्री मस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. मात्र, सोशल मीडियावरून क्षणाक्षणाला वेगवेगळी माहिती व्हायरल होत होती. त्यामुळे सभागृहात जुळणाऱ्या समीकरणाचे आडाखे कार्यकर्ते बांधत होते. दुपारी साडेतीन वाजता पालकमंत्री पंकजा मुंडे, आ. विनायक मेटे, बदामराव पंडित विश्रामगृहात दाखल झाले. तेव्हाच युतीच्या कार्यकर्त्यांच्या जीवात जीव आला. त्यानंतर लगेचच कार्यकर्त्यांनी ढोलताशाच्या गजरात ठेका धरत पेढे वाढून आनंदोत्सव साजरा केला.