जिल्ह्यातील दहाही पंचायत समिती सभापतींच्या उद्या होणार निवडी
By Admin | Updated: March 12, 2017 23:16 IST2017-03-12T23:14:11+5:302017-03-12T23:16:35+5:30
लातूर : जिल्ह्यातील १० पंचायत समित्यांपैकी ७ पंचायत समित्यांवर भारतीय जनता पार्टीने निर्विवाद वर्चस्व निर्माण केले

जिल्ह्यातील दहाही पंचायत समिती सभापतींच्या उद्या होणार निवडी
लातूर : जिल्ह्यातील १० पंचायत समित्यांपैकी ७ पंचायत समित्यांवर भारतीय जनता पार्टीने निर्विवाद वर्चस्व निर्माण केले असून, ३ पंचायत समित्यांवर काँग्रेसचे सभापती होणार आहेत. त्यादृष्टीने या दोन्ही पक्षांनी सभापती निवडीसाठी तयारी केली असून, प्रशासनाने पीठासन अधिकारी नियुक्त केले आहेत. मंगळवारी १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता त्या-त्या तहसील कार्यालयांत या निवडी होणार आहेत.
लातूर पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे २० पैकी १० सदस्य निवडून आले असून, ३ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. तर भाजपाचे ७ सदस्य या पंचायत समितीत असून, काँग्रेस आघाडीला या पंचायत समितीमध्ये स्पष्ट बहुमत असल्याने काँग्रेसचे सभापती व उपसभापती या पंचायत समितीत असतील. जळकोट पंचायत समितीत ६ पैकी ३ काँग्रेस व १ राष्ट्रवादी व १ अपक्ष मिळून जळकोट पंचायत समितीवर काँग्रेसचा सभापती होणार आहे. भाजपाचा या पंचायत समितीत केवळ एकच सदस्य निवडून आल्याने या पंचायत समितीत त्यांचा दावा असणार नाही.
औसा तालुक्यात १८ पैकी ९ जागा काँग्रेसने जिंकल्या असून, बहुमतासाठी एक जागा कमी असल्याने काँग्रेस नेतृत्वाकडून टेकू मिळविण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान, या पंचायत समितीत भाजपाचे ५, राष्ट्रवादीचे २, शिवसेना व मनसेचा प्रत्येकी एक सदस्य निवडून आला आहे. एका सदस्याचा टेकू मिळवून काँग्रेस या ठिकाणी सत्ता प्रस्थापित करील, अशी चर्चा आहे. (प्रतिनिधी)