दंत महाविद्यालयाच्या वाढल्या दहा जागा
By Admin | Updated: July 19, 2014 01:21 IST2014-07-19T00:56:26+5:302014-07-19T01:21:52+5:30
औरंगाबाद : शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयातील बॅचलर आॅफ डेंटल सर्जरी (बी.डी.एस.) पदवी अभ्यासक्रमाच्या दहा जागा तब्बल १६ वर्षांनंतर वाढविण्यात आल्या आहेत.

दंत महाविद्यालयाच्या वाढल्या दहा जागा
औरंगाबाद : शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयातील बॅचलर आॅफ डेंटल सर्जरी (बी.डी.एस.) पदवी अभ्यासक्रमाच्या दहा जागा तब्बल १६ वर्षांनंतर वाढविण्यात आल्या आहेत. याविषयीचे पत्र केंद्रीय आरोग्य विभागाकडून शासकीय दंत महाविद्यालयास गुरुवारी प्राप्त झाले. आता या महाविद्यालयातील बी.डी.एस.ची विद्यार्थी प्रवेश क्षमता ४० वरून ५० झाली आहे.
मराठवाड्यातील पहिले शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय असलेल्या या रुग्णालयाकडे सतत शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. महाविद्यालयास सोयी- सुविधा पुरविण्यासाठी वेळावेळी पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. मात्र, देशपातळीवर या महाविद्यालयाने आपला वेगळा ठसा उमटविला आहे.
१९८२ साली महाविद्यालयाची स्थापना झाली त्यावेळी तेथे बी.डी.एस. प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी ३० जागा होत्या. भारतीय दंत परिषदेने आपल्या नियमात बदल करून ३० आणि ४० विद्यार्थी क्षमतेच्या महाविद्यालयातील सुविधांचे निकष सारखेच असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे १९९८ साली या महाविद्यालयाची बी.डी.एस. प्रवेश क्षमता ३० वरून ४० करण्यात आली होती. अशाच प्रकारचा निर्णय पुन्हा दंत परिषदेने घेतल्याने अधिष्ठाता डॉ. एस.पी. बारपांडे यांनी महाविद्यालयाची प्रवेश क्षमता ४० वरून ५० करावी, असा प्रस्ताव शासनामार्फत केंद्रीय आरोग्य मंत्रालयास पाठविला होता. सतत दोन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर दंत परिषदेने मे महिन्यात एका पथकामार्फत महाविद्यालयाची तपासणी केली. या पथकाने दिलेल्या अहवालाच्या आधारे दंत परिषदेने केलेल्या शिफारशीनंतर केंद्रीय आरोग्य विभागाने महाविद्यालयातील प्रवेश क्षमता ५० करण्यास मंजुरी दिली. याबाबतची माहिती गुरुवारी त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली.
तिसऱ्या फेरीत होतील प्रवेश पूर्ण
याविषयी अधिष्ठाता डॉ. बारपांडे म्हणाले की, प्रवेश क्षमता आता ५० झाल्याने याविषयी शासनाकडून अध्यादेश निघेल.
या अध्यादेशाची माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठास सादर करण्यात येईल. त्यानंतर काही दिवसांत विद्यापीठाकडून पुन्हा महाविद्यालयातील सुविधांचा आढावा घेण्यात येईल.
ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच वैद्यकीय शिक्षण संचालकांना महाविद्यालयातील वाढीव प्रवेश क्षमतेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासंदर्भात कळविण्यात येईल. तिसऱ्या प्रवेश फेरीत वाढलेल्या जागानुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल.