खून प्रकरणात दहा जणांचे जबाब
By Admin | Updated: January 15, 2016 23:38 IST2016-01-15T23:36:12+5:302016-01-15T23:38:37+5:30
नांदेड : बारड येथील रहिवासी आणि सहयोग संकुलात प्राध्यापक असलेल्या कपिल भिमेवार खून प्रकरणाला सूत्रधार नंदू गोडसेच्या आत्महत्येनंतर वेगळीच कलाटणी मिळाली आहे़

खून प्रकरणात दहा जणांचे जबाब
नांदेड : बारड येथील रहिवासी आणि सहयोग संकुलात प्राध्यापक असलेल्या कपिल भिमेवार खून प्रकरणाला सूत्रधार नंदू गोडसेच्या आत्महत्येनंतर वेगळीच कलाटणी मिळाली आहे़ गोडसेने लिहिलेल्या मृत्युपूर्वी चिठ्ठीवरुन लातूर पोलिस पथकाने बारड येथील दहा जणांचे जबाब नोंदवून घेतले आहेत़ यातील नावांचा खून प्रकरणाची संबंध आहे किंवा केवळ राजकीय वैमनस्यातून ती टाकण्यात आली याबाबतची सत्यता पोलिस पडताळून पाहत आहेत़
२९ डिसेंबर रोजी प्रा़ कपिल भिमेवार याचे प्रेत असदवन शिवारात सापडले होते़ याप्रकरणात तीन आरोपी अटकेत असून मुख्य सूत्रधार असलेल्या नंदू गोडसे याने लातूर जिल्ह्यातील देवणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आत्महत्या केली आहे़ या आत्महत्येसाठी गोडसे याने नवीन दोर विकत घेतला होता़ तसेच त्याच्या पोटाला बांधलेल्या डायरीत त्याने मृत्युपूर्व लिहून ठेवले होते़ ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेत गोडसेने आत्महत्या केली़ ही शाळा मुख्य रस्त्यावरच आहे़ तसेच गोडसे याचे काही नातेवाईकही देवणी परिसरात आहेत़
त्यामुळे खुनाच्या घटनेनंतर गोडसे हा लातूर जिल्ह्यातच वास्तव्याला असल्याची शक्यता बळावली आहे़ दरम्यान, गोडसे याने चिठ्ठीत नमूद केलेल्या दहा जणांच्या नावाच्या आधारे लातूर पोलिसांनी तपास सुरु केला होता़ त्यानुसार दोन दिवसांपूर्वी लातूरचे पथक बारड येथे आले होते़ त्यांनी यावेळी दहा जणांचे जबाब नोंदवून घेतले़
या जबाबाच्या आधारे यापैकी कुणाचा प्राध्यापक भिमेवार याच्या खून प्रकरणाची संबंध आहे किंवा नाही याची पडताळणी पोलिस करीत आहेत़ या प्रकरणात गोडसे याला सुपारी देणारा अद्यापही मोकळाच असून पोलिसांना तपासात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ तर दुसरीकडे बारडमध्ये मात्र उलटसुलट चर्चेचे पेव फुटले आहे़ त्यामुळे या प्रकरणातील खरा आरोपी कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे़ (प्रतिनिधी)