तीन महिन्यात डेंग्यूसदृश तापाचे १० बळी
By Admin | Updated: November 3, 2014 00:38 IST2014-11-03T00:20:47+5:302014-11-03T00:38:13+5:30
जालना : गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यात अनेक गावांमध्ये डेंग्यूसदृश्य तापाने थैमान घातले असून आतापर्यंत या तापाने १० बळी घेतले आहेत

तीन महिन्यात डेंग्यूसदृश तापाचे १० बळी
जालना : गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यात अनेक गावांमध्ये डेंग्यूसदृश्य तापाने थैमान घातले असून आतापर्यंत या तापाने १० बळी घेतले आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने डेंग्यूने एकाही रुग्णाचा बळी गेला नसल्याचा दावा केला आहे. याउलट ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचा ठावठिकाणा राहत नाही, त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी शहराकडे धाव घ्यावी लागत आहे.
दोन दिवसांपूर्वीच झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेतही डेंग्यूचा विषय गाजला. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून विविध गावांमध्ये डेंग्यूसदृश्य तापाचे रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाने पाहिजे तशी दखल घेतली नाही. किंबहुना या साथरोगाला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेने सांघिकरित्या काहीच केले नाही.
पंचायत विभागामार्फत त्या-त्या गावांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी काहीच प्रयत्न झाले नाहीत. ग्रामपंचायतींनी एकदा धूरफवारणी केली. परंतु पुढे ती झाली नाही.
भोकरदन तालुक्यातील पद्मावती, अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथे अनुक्रमे दोन व तीन जणांचा डेंग्यूसदृश्य तापाने मृत्यू झाला. परतूर शहर,जळगाव सपकाळ येथे एका तरूणाचा मृत्यू झाला. नळणी, कोदोली, वालसावंगी, लेहा, बठाण इत्यादी ठिकाणीही डेंग्यूसदृश्य आजाराचे रुग्ण आढळून आले. अन्य काही ठिकाणीही तापाच्या आजाराने ५ रुग्णांचा मृत्यू झाला.
अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये डासअळी आढळून आली. घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होता. रुग्णांमध्ये विशेषत: बालकांमध्ये शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्या कमी होण्याचे प्रकार आढळून आले. गावात डॉक्टर नसल्याने तापाने फणफणलेल्या काहींनी आजार अंगावरच काढला. त्याचा परिणाम म्हणून या रुग्णांची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे त्यांना शहरी भागात नेऊन तेथील रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागले, असे काही ठिकाणच्या ग्रामस्थांनी सांगितले. (प्रतिनिधी)