खड्ड्यांसाठी दहा लाखांचे टेंडर

By Admin | Updated: November 18, 2015 00:37 IST2015-11-18T00:27:57+5:302015-11-18T00:37:30+5:30

राजू छल्लारे , वडीगोद्री अंबड-वडीगोद्री २२ कि़ मी. रस्त्यावरील खड्डे महिनाभरापूर्वीच मुरूम टाकून बुजवून पैशाची उधळपट्टी झाली असताना आता पुन्हा या रस्त्याचे डागडुजीचे टेंडर काढून

Ten lakhs of tender for the pits | खड्ड्यांसाठी दहा लाखांचे टेंडर

खड्ड्यांसाठी दहा लाखांचे टेंडर


राजू छल्लारे , वडीगोद्री
अंबड-वडीगोद्री २२ कि़ मी. रस्त्यावरील खड्डे महिनाभरापूर्वीच मुरूम टाकून बुजवून पैशाची उधळपट्टी झाली असताना आता पुन्हा या रस्त्याचे डागडुजीचे टेंडर काढून डांबर, खडीने बुजविण्याचे काम सध्या सुरू आहे. पण रस्त्याचे हित कमी खड्डे बुजवण्यात गुत्तेदारांचे जास्त हित दिसत आहे. खड्डे मात्र कमी झाले नाही. उलट महिनाभरात या रस्त्यावर दुसऱ्यांदा डागडुजीसाठी कामे सुरु करण्यात आली आहे. डागडुजीसाठी १० लाख रुपये निधी मंजूर करून गुत्तेदार व स्वत: या रस्त्यात स्वत:च्याच तिजोरी भरताना दिसत आहे.
वडीगोद्री-अंबड या रस्त्यावर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे कळायला मार्ग नाही. खड्ड्याने रस्त्याची अक्षरश: चाळणी होऊन मोठी दुरवस्था झाल्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन जावे लागते. या रस्त्यावरील खड्ड्यामुळे अनेकांनी आपला जीव गमावला तरीही या रस्त्याचे भीजत घोंगडे अजुनही कायम आहे. रस्त्याच्या निधीला व कायमस्वरूपीच्या दुरूस्तीला मुहूर्त सापडत नाही. राजकीय नेते व अधिकाऱ्यांना बळी गेलेल्या जीवांचे काहीच सोयरसूतक नाही. महिनाभरापूर्वीच हे खड्डे मुरूम टाकून बुजविण्याची शक्कल अधिकाऱ्याने लढविली पण ही शक्कल लढविताना अधिकाऱ्यांना बारीक मुरूमाचा विसरच पडला होता. याबरोबर खड्ड्यात टाकलेल्या मुरूमावर रोलरने दबाई करण्याचेही सौजन्य दाखविण्यात आले नाही. त्यांनी चक्क मोठा खडीदार मुरूम आणून टाकलेला होता. आता हा मुरूम शोधूनही कोठे सापडत नाही. त्यामुळे खड्ड्यांची परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली
आहे.
मुरूमाऐवजी डांबराने चांगली डागडुजी झाली असती तर वाहनधारकांना दिलासा मिळाला असता. परंतु मुरूमाने बोळवण करून अधिकाऱ्याने स्वत:चे हित जोपासले. आता या रस्त्यावर मुरूम शोधूनही सापडत नसल्याने पुन्हा या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी ई-टेंडरींग काढले आणि डांबर, खडीने रस्त्यावरील खड्डयात अंथरून ते बुजविण्याचा प्रयोग अधिकारी करत आहेत. पण हा प्रयोग गुत्तेदाराच्या मनमानीनुसार सुरू आहे.
बुजलेले खड्डे महिनाभरही टिकेल की नाही, याची शाश्वती राहिली नाही. या अगोदरही असे खड्डे बुजविण्याचे प्रयोग अनेकवेळा झाले पण खड्डे मात्र, कमी झाले नाही.
या संदर्भात अंबड येथील सा.बां. विभागाचे उपअभियंता शंभरकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, महिन्याभरापूर्वी टाकलेला मुरूम हा तात्पुरती डागडुजी होती. आता या रस्त्याच्या डागडुजीसाठी ई-टेंडरींग काढून यासाठी १० लाखांचा निधी मिळाला असल्याचे सांगितले. कामाचा दर्जा संदर्भात विचारले तर आपण गावाकडे असून, याबद्दल कोणीतीही माहिती नसल्याचे सांगून उडवा उडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली. १० लाख रुपयांचा निधी मंजूर होऊनही रस्त्यावरील पूर्णच खड्डे बुजविताना कोठेही दिसत नाही. यामुळे अधिकारी व गुत्तेदार यांच्या बोगस कामाचा सर्वसामान्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Ten lakhs of tender for the pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.