बँकेच्या शिपायाला मारहाण करून दहा लाख लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:05 IST2021-05-07T04:05:21+5:302021-05-07T04:05:21+5:30

कन्नड : शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेतून ताब्यात घेतलेल्या दहा लाख रुपयांची रोख रकमेची बॅग घेऊन जाणाऱ्या बँकेच्या ...

Ten lakh was looted by beating a bank soldier | बँकेच्या शिपायाला मारहाण करून दहा लाख लुटले

बँकेच्या शिपायाला मारहाण करून दहा लाख लुटले

कन्नड : शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेतून ताब्यात घेतलेल्या दहा लाख रुपयांची रोख रकमेची बॅग घेऊन जाणाऱ्या बँकेच्या शिपायाला जामडी-वडनेर रस्त्यावर तीन अज्ञातांनी अडवून मारहाण करीत लुटले. ही घटना गुरुवारी अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शिपाई बी. के. बाविस्कर यांनी दुपारी १:४० मिनिटांच्या सुमारास कन्नड येथील मुख्य शाखेतून वडनेर शाखेसाठी दहा लाख रुपये ताब्यात घेतले. ही रक्कम थैलीत टाकून ते स्वत:च्या ताब्यातील दुचाकीने (एमएच २० बीझेड ९५३८) वडनेर शाखेकडे निघाले. दरम्यान, मुंडवाडी-जामडी-कोळवाडी मार्गे वडनेरकडे जात असताना जामडी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञातांपैकी एकाने शिपाई बाविस्कर यांना डोक्यात दगड मारून जखमी केले. दगड लागताच बाविस्कर खाली पडले. याची संधी साधत त्यांच्याकडील रोख रकमेची पिशवी हिसकावून जामडी गावाच्या दिशेने पळ काढला. जखमी अवस्थेतदेखील बाविस्कर यांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र, चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले.

जामडी गावात गेल्यावर राजू पवार नावाच्या व्यक्तीला त्यांनी घ़डलेला प्रकार सांगितला, तर बाविस्कर यांना नागरिकांनी प्राथमिक उपचार दिले. तत्काळ बँकेच्या रोखपाल योगेश तागवाले यांना माहिती देण्यात आली. तागलावे यांनी मुख्य शाखेत यासंदर्भात माहिती कळविली. शिपाई बाविस्कर यांनी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतः हजर होऊन घटनेची माहिती दिली.

उपविभागीय पोलीस अधिकारी नेहुल, प्रशिक्षणार्थी डीवायएसपी गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, शहर पोस्टेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, ग्रामीणचे निरीक्षक सुनील नेवसे यांच्यासह पोलीस पथकांनी परिसर पिंजून काढला. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Web Title: Ten lakh was looted by beating a bank soldier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.