नानेगावात अज्ञाताने लावलेल्या आगीत दहा लाखांचे साहित्य भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:03 IST2021-05-07T04:03:21+5:302021-05-07T04:03:21+5:30
दावरवाडी : पैठण तालुक्यातील नानेगाव येथे शेतवस्तीवर अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत शेतीउपयोगी अवजारांसह सुमारे दहा लाख रुपयांचे साहित्य भस्मसात ...

नानेगावात अज्ञाताने लावलेल्या आगीत दहा लाखांचे साहित्य भस्मसात
दावरवाडी : पैठण तालुक्यातील नानेगाव येथे शेतवस्तीवर अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत शेतीउपयोगी अवजारांसह सुमारे दहा लाख रुपयांचे साहित्य भस्मसात झाले. ही घटना गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
गणपतराव माने या शेतकऱ्याची नानेगाव-बालानगर रस्त्यालगत शेती आहे. येथील शेतवस्तीवरील घराला गुरुवारी दुपारी अज्ञात व्यक्तीने आग लावली. वाऱ्यामुळे थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केल्याने मळ्याच्या परिसरात ही आग पसरली. दरम्यान, आग लागल्याचे लक्षात येताच गणपतराव माने यांनी आरडाओरड केली. यावेळी सुदाम माने, बळीराम माने, अशोक माने, निवृत्ती मगर, प्रेमनाथ चाटुफळे, राजू माने आदींनी त्याठिकाणी येत शेडमध्ये बांधलेल्या दोन बैल जोड्या, गायींना गोठ्याबाहेर काढल्याने या जनावरांचा जीव वाचला. या आगीत जनावरांचा १५०० पेंढी कडबा, जनावरांचे खाद्य, भुस, कडबा कुट्टी मशीन, मोटार, दोन विद्युत पोलच्या तारा, ६ क्विंटल कांद्याचे बियाणे, सागवान लाकडे, ६० पीव्हीसी पाईप, जवळपास पन्नास पत्र्यांचे शेड, शेणखत व शेतीच्या मशागतीची औजारे जळून खाक झाली आहेत. शेजारील शेतातील गवतही होरपळले आहे. या आगीची माहिती माजी सरपंच तथा शेतकरी गणपतराव माने यांनी पाचोड पोलीस, अग्निशामक विभाग पैठण व तहसील प्रशासनाला कळवताच घटनास्थळी अग्निशामक पर्यवेक्षक जयसिंग सांगळे, खलिलभाई धांडे, कामील धांडे, जब्बी धांडे, संतोष चव्हाण आदींनी धाव घेत दुपारी दोन वाजता आग आटोक्यात आणली. पाचोड ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे, फौजदार सुशांत सुतळे, जमादार हनुमंत धनवे, एन. आर. अंधारे, प्रशांत मुळे, पोलीसपाटील संतोष बोधने यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तलाठी साळवे यांनी नुकसानाचा पंचनामा केला. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
कोट
आग लागली तेव्हा परिसरात विजेचे भारनियमन सुरु होते. त्यामुळे शॉर्टसर्किटने ही आग लागलेली नाही. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ही आग लावली आहे. यात माझे अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
- गणपतराव माने, शेतकरी
छाया : नानेगाव येथील शेतकरी गणपतराव माने यांच्या मळ्यात लागलेली आग विझवण्यासाठी दाखल झालेली अग्निशमन विभागाची गाडी.
060521\img_20210506_134417_1.jpg
नानेगाव येथे आग विझविण्यासाठी दाखल झालेली अग्नीशमन विभागाची गाडी.