परीक्षा विभागातील ‘कंत्राटीं’च्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:38 IST2017-07-28T00:38:48+5:302017-07-28T00:38:48+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील बदल्यांचा सिलसिला साई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गैरकृत्यापासून सुरू आहे.

परीक्षा विभागातील ‘कंत्राटीं’च्या बदल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील बदल्यांचा सिलसिला साई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गैरकृत्यापासून सुरू आहे. यात गुरुवारी ३४ कंत्राटी कर्मचाºयांच्या बदल्यांची भर पडली. या बदल्यांमुळे पुनर्तपासणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिकांमुळे परीक्षा विभागाचे कामकाज खोळंबण्याचा दावा परीक्षा विभागातील सहायक कुलसचिवांनी केला आहे.
विद्यापीठाशी संलग्न असलेल्या साई अभियांत्रिकी महाविद्यालयाने १६ मे च्या मध्यरात्री एक दिवसापूर्वी झालेल्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे सीलबंद पाकीट फोडत नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरी उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना लिहिण्यास दिल्या. या गैरप्रकाराची भंडाफोड पोलिसांनी केल्यानंतर देशभर विद्यापीठाची बदनामी झाली. या प्रकारानंतर चौथ्या दिवशी कुलगुरू डॉ. बी . ए. चोपडे यांनी परीक्षा विभागातील अभियांत्रिकीच्या कर्मचाºयांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. तेव्हाच इतर कर्मचाºयांच्या बदल्यांचे सूतोवाच केले होते. यानंतर काही दिवसांनी परीक्षा विभागासह इतर विभागांत अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या तब्बल १३६ कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र, परीक्षांचे निकाल लावण्यास विलंब होण्याच्या शक्यतेमुळे परीक्षा विभागातील कर्मचाºयांना रिलिव्ह केले नाही. मात्र दोन दिवसांपूर्वी बदल्या झालेल्या कर्मचाºयांना परीक्षा विभागाने रिलिव्ह केले. यानंतर गुरुवारी परीक्षा विभागातील ३४ कंत्राटी कर्मचाºयांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत, तर इतर विभागातील २६ जणांना परीक्षा विभागात पाठविण्यात आले असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. यातील बहुतांश कंत्राटी कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून परीक्षा विभागातच कार्यरत होते.
कंत्राटदाराला दिले आदेश
विद्यापीठ प्रशासनाने स्वत: बदल्या करण्याऐवजी कंत्राटदाराकडे यादी देत कंत्राटी कर्मचाºयांच्या बदल्या करण्याच्या सूचना दिल्या. यानुसार कंत्राटदार कंपनीने कर्मचाºयांच्या बदल्यांचे आदेश काढले.
विद्यापीठ प्रशासनाने काही पावले उचलायचा प्रयत्न केल्यास कर्मचारी संघटना तसेच मोक्याच्या ठिकाणावर बसलेल्या काही जणांचा विरोध होतो, हा अनुभव आजही प्रशासनाला आला.
दरम्यान, आधी काही कंत्राटी व कायमस्वरुपी कर्मचाºयांच्या केलेल्या बदल्यांमुळे काही विभागांचे कार्यालयीन काम खोळंबले आहे. काही विभागांतील प्रवेश प्रक्रियेसाठी तसेच काही तांत्रिक कामांसाठी विभागप्रमुखांना आणि प्राध्यापकांना डोकेफोड करावी लागत असल्याची परिस्थिती आहे. विशेषकरुन विज्ञान अभ्यासक्रमांच्या विभागांमध्ये ही परिस्थिती असल्याचे दिसून येते.