बस खरेदीला मनपाचा तूर्त ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:58 IST2017-07-22T00:57:08+5:302017-07-22T00:58:42+5:30
औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत १३ नवीन बस खरेदी करण्याचा प्रस्ताव गुरुवारी मनपा प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर ठेवला.

बस खरेदीला मनपाचा तूर्त ब्रेक
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत १३ नवीन बस खरेदी करण्याचा प्रस्ताव गुरुवारी मनपा प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर ठेवला. शहर बससेवा चालविण्यासाठी महापालिकेकडे कोणतीच यंत्रणा नाही. अशा परिस्थितीत ३ कोटी रुपये खर्च करून कशासाठी बस खरेदी करण्यात येत आहेत, या मुद्यावर नगरसेवकांनी प्रशासकीय हेतूला ‘ब्रेक’लावला. नगरसेवकांचा विरोध लक्षात घेऊन महापौर बापू घडमोडे यांनी प्रस्ताव तूर्त स्थगित ठेवला.
शहर बससेवा चालविण्याचे दायित्व महापालिकेवर असतानाही मागील काही वर्षांपासून प्रशासन ही जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहे. एसटी महामंडळाने अनेकदा ही सेवा बंद करण्याचा इशारा दिला. तरीही महापालिका कोणतेच ठोस पाऊल उचलण्यास तयार नाही. अनेकदा खाजगी कंत्राटदारांमार्फत ही सेवा सुरू करण्याचे प्रयत्न झाले, पण राजकीय मंडळींना यश प्राप्त झाले नाही. गुरुवारी सर्वसाधारण सभेत ऐनवेळी मनपा प्रशासनाने एक धक्कादायक प्रस्ताव ठेवला. त्यात शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेत १३ मिनी बस खरेदी करण्याचा मानस व्यक्त केला. त्यासाठी विविध कंपन्यांच्या डीलर्सकडून दरपत्रकेही मागविण्यात आल्याचे नमूद केले. छोट्या बसमध्ये आसन क्षमता ३४ राहील. पर्यटकांसाठी एक ४० आसनी वातानुकूलित, दुसरी १९ आसनी वातानुकूलित बस खरेदी करण्यात येईल. सर्व बस खरेदी, आरटीओची फिस आदी कामांसाठी सुमारे ३ कोटी रुपये लागतील, असेही प्रस्तावात शहर अभियंता सिकंदर अली यांनी नमूद केले. शासनाकडून साडेतीन कोटी रुपयांचे अनुदान मिळविण्यासाठी हा प्रस्ताव मंजूर करावा, असा आग्रह त्यांनी धरला.