घरगुती गॅसवर हॉटेलमध्ये ‘फोडणी’

By Admin | Updated: June 6, 2014 01:05 IST2014-06-06T00:44:30+5:302014-06-06T01:05:41+5:30

लोकमत चमू, उस्मानाबाद अनेकदा आपल्या घरातील गॅस सिलेंडर मुदतीच्या आत संपतो, अशावेळी दुसरी टाकी घेण्यासाठी गेल्यास एजन्सीधारक नियम दाखवितो. मात्र,

'Temporal' at domestic gasoline | घरगुती गॅसवर हॉटेलमध्ये ‘फोडणी’

घरगुती गॅसवर हॉटेलमध्ये ‘फोडणी’

लोकमत चमू, उस्मानाबाद
अनेकदा आपल्या घरातील गॅस सिलेंडर मुदतीच्या आत संपतो, अशावेळी दुसरी टाकी घेण्यासाठी गेल्यास एजन्सीधारक नियम दाखवितो. मात्र, दुसरीकडे प्रशासनाच्या वरदहस्तामुळे गॅस वितरक सर्व नियम धाब्यावर बसवित असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमधून उजेडात आले आहे. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून घरगुती वापराचा गॅस अनेक हॉटेलमध्ये दिवसाढवळ्या वापरला जात आहे. त्यामुळे अशा गैरप्रकारावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा करते काय? त्यांचे साटेलोटे तर नाही ना, असे एक ना अनेक सवाल सर्वसामान्यांतून उपस्थित केले जात आहेत. शहरातील विविध भागात फेरफटका मारला असता, सदरील गंभीर प्रकार उजेडात आला.
नागरी भागाचा विचार केला तर आज गॅस ही सर्वांचीच अनन्यसाधारण गरज बनली आहे. मात्र एकीकडे पैसे मोजूनही सर्वसामान्य ग्राहकांना वेळेवर गॅस उपलब्ध होत नाही. गॅससाठी दिवसभर उन्हातान्हात रांगा लावण्याची वेळ त्यांच्यावर येते. तर दुसरीकडे घरगुती वापराचा गॅस अगदी सहजपणे हॉटेल व्यावसायिकांना उपलब्ध होतो. शासकीय कार्यालय परिसरातील कॅन्टीन, मुख्य रस्त्याच्या बाजूला सुरू असलेले चहाचे गाडे, वडापाव सेंटर अशा अनेक ठिकाणी घरगुती गॅसचा सर्रास वापर सुरू आहे. हा प्रकार दिवसाढवळ्या सुरु असतानाही त्याबाबत कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. हा सर्व गोरखधंदा नियंत्रण ठेवणार्‍या अधिकार्‍यांच्या नजरेत कसा पडत नाही. असा सवाल नागरिकांना पडत आहे. पंचायत समिती, बसस्थानक परिसर, ताजमहल टॉकीज परिसर, जिल्हाधिकारी निवासस्थानापासून तांबरी विभागाकडे जाणारा रस्ता, नेहरू चौक, नगर परिषद परिसर, शिवाजी चौक आदी ठिकाणी हेच चित्र होते.
जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानापासून तांबरी विभागाकडे जाणार्‍या रस्त्याच्या बाजुने असणार्‍या अन्नपदार्थांच्या गाड्यावर तसेच हॉटेल्समध्ये बिनधोकपणे घरगुती गॅसचा वापर सुरु आहे. ‘लोकमत’ चमू बार्शीनाका येथे दाखल झाल्यानंतर काही वडापावच्या गाड्यावर घरगुती गॅसच्या टाक्या दिसून आल्या. सर्वसामान्य ग्राहक एकेका टाकीसाठी तरसत असताना येथे मात्र, अतिरिक्त टाक्या दिमतीला होत्या. हा प्रकार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, याचा शोध घेण्याची गरज व्यक्त होत आहे. ‘लोकमत’चमू मुख्य बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या नेहरू चौकात दाखल झाला. यावेळी येथे असलेल्या एका हॉटेलमध्ये गॅसच्या दोन टाक्या दिसून आल्या. यापैकी एक टाकी व्यावसायिक तर दुसरी घरगुती वापरासाठीची होती. व्यावसायिक टाकीच्या पाठीमागे घरगुती वापराची टाकी ठेवून वापर सुरू होता. हॉटेलसमोरून येणार्‍या-जाणार्‍यांसाठी ‘येथे व्यावसायिक गॅस वापरला जात आहे’, असे भासविण्यासाठी ही सर्व उठाठेव.
येथून ‘लोकमत’ चमू शिवाजी चौकात आल्यानंतर या परिसरातील चहाच्या हॉटेलमध्ये एक नव्हे तर दोन-दोन टाक्या दिसून आल्या. त्याही अतिरिक्त. खुलेआम सुरू असलेला हा गैरप्रकार संबंधित यंत्रणेच्या लक्षात कसा येत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नगर परिषदेसमोर असलेल्या काही गाड्यांवरही हाच प्रकार दिसून आला. पंचायत समिती परिसरात आल्यानंतर येथील काही हॉटेलमध्ये खुलेआम घरगुती गॅसचा वापर केला जात होता. अशीच परिस्थिती अन्य भागातही आहे. त्यामुळे कारवाई करण्याची भाषा करणार्‍या जिल्हा प्रशासनाच्या नजरेत हा प्रकार येत नाही का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
प्रशासनाचा धाकच उरला नाही
एखाद्या सर्वसामान्य ग्राहकाला गॅस हवा असले तर त्याला अगोदर नोंदणी करावी लागते. घरपोच हवा असले तर ठरावीक चार्ज द्यावा लागतो. एवढे करूनही सिलेंडर मिळाले नाही तर संबंधित एजन्सीच्या ठिकाणी जावून सिलेंडर घेवून यावे लागते. मात्र, दुसरीकडे व्यवसायासाठी खुलेआम घरगुती सिलेंडर वापरात आणले जात आहेत. एक टाकी संपण्यापूर्वीच दुसरी उपलब्ध होते. हा सर्व प्रकार उघडपणे सुरू असतानाही यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेले अधिकारी, यंत्रणा करते काय? त्यांचा धाक उरला नाही की काय? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रशासनाने इच्छाशक्ती दाखविल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो.
खाणावळींमध्येही घरगुती गॅस
शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खानावळी सुरू आहेत. अशा खाणावळींसाठी मोठ्या प्रमाणात सिलेंडर लागतात. काही खाणावळचालक घरगुती सिलेंडरचा सर्रास वापर करीत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याकडे वेगवेगळ्या लोकांच्या नावावरील कार्डही असल्याचे समजते. या कार्डवरच ते गरजेनुसार हवे तेवढे सिलेंडर मिळवित असल्याचे सूत्रांनी सांगितले. एकीकडे व्यावसायिकांना अशा पध्दतीने अत्यंत सहजपणे नियमबाह्यपणे सिलेंडर मिळतता. सर्वसामान्यांना मात्र नियमानुसारही मिळविताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो.

Web Title: 'Temporal' at domestic gasoline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.