सव्वासातशे वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर
By Admin | Updated: July 9, 2014 00:27 IST2014-07-08T22:47:19+5:302014-07-09T00:27:43+5:30
संजय खाकरे , परळी देशातील बारा ज्योर्र्तिलिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या परळीत संत जगमित्राच्या वस्तीस्थानी असलेल्या विठ्ठल मंदिरात भाविक दर्शनासाठी रांगा लावत आहेत.

सव्वासातशे वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर
संजय खाकरे , परळी
देशातील बारा ज्योर्र्तिलिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या परळीत संत जगमित्राच्या वस्तीस्थानी असलेल्या विठ्ठल मंदिरात भाविक दर्शनासाठी रांगा लावत आहेत. हे मंदिर जवळपास सव्वा सातशे वर्षापूर्वीचे असल्याने भाविकांचे श्रद्धास्थान ठरत आहे.
संत जगमित्र मंदिर परिसरात विठ्ठल रखुमाईचे मंदिर आहे. या मंदिराला इतिहास असून वाघाच्या रुपाने पांडुरंग जगमित्र नागाला भेटायला आले होते, अशी अख्यायिका आहे. मेरु शिखराखालील संत जगमित्राच्या वस्तीस्थान परिसरात विठ्ठल-रखुमाईची मूर्ती आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी संत जगमित्र मंदिरात विठ्ठल-रखुमार्ईच्या मूर्तीसमोर सकाळी पाच वाजता महापूजा, सहा वाजता आरती, त्यानंतर दर्शन, संध्याकाळी पाच वाजता अलकांर पूजा, रात्री आठ ते नऊ भजन धूप आरती हे कार्यक्रम होतात. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागतात. आषाढी एकादशीच्या दिवशी वैद्यनाथाच्या दर्शनासाठीही भाविक मोठी गर्दी करतात. तसेच देशपांडे गल्ली, जाजुवाडी येथेही विठ्ठल-रखुमाईचे मंदिर आहे.
या मंदिरातही भाविक गर्दी करतात. दर वैद्यवारीला काकडा, आरती, पूजा, रामायण, संध्याकाळी धूप आरती, भजन, कीर्तन, जागर हे कार्यक्रम शहरात घेतले जातात. गोकुळाष्टमीचा सप्ताह, जगमित्र नागाची पुण्यतिथी असे विविध कार्यक्रमही घेण्यात येतात. संत ज्ञानेश्वरांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा समाधीस्थळी जगमित्र उपस्थित होते. तेथून संत जगमित्र नागा हे खरे भागवत धर्माच्या प्रचारासाठी परळी क्षेत्रात आले.
हरिनामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला
'हरीमुखे म्हणा, हरीमुखे म्हणा' असे अभंग गात भाविकांनी भक्तिभावाने मंगळवारपासूनच विठूरायाचे दर्शन घेतले़ मंदिर परिसरात मंगळवारपासून अनेक भाविकांनी टाळ मृदंगाच्या गजरात नामस्मरण केल्याचे मंदिराचे पुजारी शामराव औटी यांनी सांगितले़