आधी तापमान; मग मतदान
By | Updated: December 2, 2020 04:12 IST2020-12-02T04:12:03+5:302020-12-02T04:12:03+5:30
पदवीधर निवडणुकीसाठी खबरदारी : आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पाडली पहिल्यांदाच जबाबदारी औरंगाबाद : मतदान केंद्रांवर जाणाऱ्या मतदारांना यापूर्वी मतदान करण्याआधी ओळखपत्र ...

आधी तापमान; मग मतदान
पदवीधर निवडणुकीसाठी खबरदारी : आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पाडली पहिल्यांदाच जबाबदारी
औरंगाबाद : मतदान केंद्रांवर जाणाऱ्या मतदारांना यापूर्वी मतदान करण्याआधी ओळखपत्र दाखवावे लागत होते. परंतु, कोरोना काळात पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मंगळवारी थर्मल गनने शरीराच्या तापमानाची तपासणी केल्यानंतरच मतदान केंद्रांवर मतदारांना प्रवेश देण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पहिल्यांदाच मतदान केंद्रांवर जबाबदारी पार पाडली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रत्येक मतदाराच्या सुरक्षेला प्राधान्यक्रम देण्यात आला. निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला मास्कचा वापर बंधनकारक केला होता. मतदान केंद्रांवर आरोग्य अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले होते. सकाळपासूनच मतदार मतदान केंद्रावर येत होते. कोरोनाच्या लक्षणात ताप हे एक प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावरच मतदारांना थांबवून त्यांची थर्मल गनने तपासणी करण्यात येत होती. शरीराचे तापमान योग्य असेल तरच मतदारांना आत प्रवेश दिला जात होता. शिवाय, मास्कही बंधनकारक होता. अनेक जण विनामास्क येत होते. त्यांना मास्क लावण्याची सूचना कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती. मास्कचे वाटपही करण्यात आले.
मतदानासाठी रांगेत उभे राहिल्यानंतर सोशल डिस्टन्सचे पालन होण्यासठी चौकोन आखण्यात आले होते. त्या चौकोनमध्येच उभे रहा, अशी सूचना मतदारांना केली जात होती. प्रत्यक्ष मतदानासाठी आतमध्ये जाणाऱ्या प्रत्येक मतदाराच्या हातावर सॅनिटायझर टाकले जात होते. आरोग्य उपसंचालक डाॅ. स्वप्निल लाळे म्हणाले, यापूर्वी घेण्यात आलेल्या परीक्षांत जी काळजी घेतली, त्याचप्रमाणे मतदानप्रक्रियेत आरोग्य विभागाने जबाबदारी पार पाडली. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुंदर कुलकर्णी यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.
चौकट...
लहान मुलांचा सांभाळ
मतदान कक्षात लहान मुलांना नेण्यास मज्जाव होता. अनेक महिलांनी मतदानावेळी सोबत लहान मुलांना आणले होते. अशा लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी महिला कर्मचारीही कार्यरत होत्या.