जिल्ह्यात तापमानाचा पारा ८.९ अंशावर घसरला !
By Admin | Updated: January 12, 2015 14:16 IST2015-01-12T14:15:53+5:302015-01-12T14:16:01+5:30
जिल्हाभरात मागील चार-पाच दिवसांपासून तापमानामध्ये सातत्याने घसरण होवू लागली आहे. रविवारी पारा ८.९ अंशावर घसरल्याची नोंद झाली आहे

जिल्ह्यात तापमानाचा पारा ८.९ अंशावर घसरला !
उस्मानाबाद : जिल्हाभरात मागील चार-पाच दिवसांपासून तापमानामध्ये सातत्याने घसरण होवू लागली आहे. रविवारी पारा ८.९ अंशावर घसरल्याची नोंद झाली आहे.
यंदा सरासरीच्या पन्नास टक्केही पाऊस झालेला नसला तरी गतवर्षीच्या तुलनेत तापमानामध्ये मोठय़ा प्रमाणात घसरण होताना दिसत आहे. मागील चार पाच दिवसांपासून तर पारा आठ ते नऊ अंशादरम्यान राहिला आहे. ७ जानेवारी रोजी किमान तापमानाची नोंद १२.३ अंश सेल्सियश, ८ जानेवारी रोजी १0.९, ९ जानेवारी रोजी ८.९, १0 रोजी ७.८ तर ११ जानेवारी रोजी ८.९ अंश सेल्सियश एवढी झाली आहे. तापमानामध्ये सातत्याने घसरण होत असल्याने अख्ख्या जिल्ह्याला हुडहुडी भरली आहे. त्यामुळे अबालवृद्ध हैराण झाले आहेत.
फळ पिकांना अपायकारक
तुळजापूरसह भूम तालुक्याच्या काही भागात द्राक्षाचे मोठय़ा प्रमाणात क्षेत्र आहे. हे तापमान द्राक्षासारख्या पिकांसाठी अपायकारक ठरू शकते. त्यामुळे शेतकर्यांनी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
रस्त्यावरील वर्दळ विरळ
मागील चारपाच दिवसांपासून दुपारनंतर थंडीचा जोर वाढत आहे. सायंकाळच्या सुमारास तर उबदार कपडे घालण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे रात्री सात वाजल्यापासून शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतूक विरळ होताना दिसत आहे.
उबदार कपड्यांना मागणी वाढली
थंडीचा जोर वाढत असल्याने अबालवृद्ध बेजार झाले आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी जो-तो उबदार कपडे खरेदी करताना दिसत आहे.