छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे व्हिडीओ पाहण्यात आम्हाला स्वारस्य नाही. काम कधी पूर्ण होणार ते निश्चित सांगा. ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून वाढीव पाणी शहराला कधी देणार हे सुद्धा सांगावे, अशा शब्दात सोमवारी स्थानिक भाजपा नेत्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे कान उपटले. नवीन योजना डिसेंबर २०२५ पर्यंत तर ९०० मिमीचे पाणी जुलैमध्ये देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांंनी दिले.
शहराला मागील दोन महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. बहुतांश नागरिक टँकरवर दिवस काढत आहेत. त्यातच उद्धवसेनेने ‘लबाडांनो पाणी द्या’ म्हणत आंदोलन छेडले. त्यामुळे पाणीप्रश्न गंभीर वळणावर येऊन ठेपला आहे. त्यातच सोमवारी अचानक ओबीसी विकासमंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आ. संजय केणेकर यांनी स्मार्ट सिटी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीपासून प्रसारमाध्यमांना दूर ठेवण्यात आले. बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा), महापालिका, महावितरण, कंत्राटदार कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. दुपारी २:३० वाजता सुरू झालेली बैठक सायंकाळी ६ वाजता संपली.
बैठकीत काढला नवीन मुर्हूतबैठकीत अतुल सावे, डॉ. कराड यांनी नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाबद्दल प्रश्नांची सरबत्तीच सुरू केली. मजीप्रा अधिकाऱ्यांनी, कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधींनी कामाचे व्हिडीओ दाखविण्यास सुरुवात केली. त्यावर सावे यांनी व्हिडीओ नको, योजनेचे काम कधी पूर्ण होणार ते सांगा, असा प्रश्न केला. अधिकाऱ्यांनी दबक्या आवाजात डिसेंबर असे उत्तर दिले. योजनेच्या कामावर मजुरांची संख्या वाढवावी, अशी सूचना नेत्यांनी केली. कंत्राटदार कंपनीवर तुम्ही सक्ती केली पाहिजे.
वाढीव पाणी जुलैमध्ये९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीसाठी फारोळा येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू आहे. हे काम जून महिन्यात पूर्ण होईल आणि जुलै महिन्यापासून शहराला वाढीव पाणी मिळेल, असे आश्वासन मजीप्रा अधिकाऱ्यांनी भाजपा नेत्यांना दिले.
केणेकर बैठकीतून निघून गेलेपाणी टंचाईवर बैठक घेण्याची मागणी मनपाकडे आ. संजय केणेकर यांनीच दोन आठवड्यांपूर्वी केली होती. सोमवार त्यांनी बैठक अर्धवट सोडली. पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे त्यांना जावे लागल्याचे यावेळी सांगण्यात आले.