तहसीलदारांना बजावली कोविड सेंटरच्या प्रमुखांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:05 IST2021-04-09T04:05:01+5:302021-04-09T04:05:01+5:30
बेजबाबदारपणा : कोरोनाबाधित विद्यार्थी परीक्षेसाठी महाविद्यालयात दाखल प्रकरण पैठण : सुरक्षेची साधने न वापरता कोरोनाबाधित विद्यार्थी प्रतिष्ठान महाविद्यालयात परीक्षा ...

तहसीलदारांना बजावली कोविड सेंटरच्या प्रमुखांना नोटीस
बेजबाबदारपणा : कोरोनाबाधित विद्यार्थी परीक्षेसाठी महाविद्यालयात दाखल प्रकरण
पैठण : सुरक्षेची साधने न वापरता कोरोनाबाधित विद्यार्थी प्रतिष्ठान महाविद्यालयात परीक्षा देत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात प्रकाशित केला. या वृत्ताची दखल घेत पैठण तहसीलदारांनी ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथकाचे प्रपाठक यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांना २४ तासांच्या आत खुलासा करण्यास सांगितले आहे. मुदतीत खुलासा न केल्यास जिल्हाधिकारी यांच्याकडे कारवाईचा प्रस्ताव दिला जाईल, असा इशारा प्रपाठकांना नोटिसीद्वारे देण्यात आला आहे.
बुधवारी (दि. ७) पदवी परीक्षेचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. प्रतिष्ठान महाविद्यालयात १४५५ विद्यार्थी परीक्षा देत होते. या विद्यार्थ्यांत शहरातील कोविड सेंटरमधून कोरोनाबाधित विद्यार्थी परीक्षेसाठी आल्याची माहिती महाविद्यालयात धडकताच एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी परिस्थिती हाताळून सदर विद्यार्थ्यास शोधून काढले. त्यानंतर त्याची स्वतंत्र व्यवस्था करून परीक्षा घेण्यात आली. याचा परीक्षा देणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांना मोठा धसका बसला होता. या सर्व प्रकारास कोविड सेंटरच जबाबदार आहे, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. हा प्रकार ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात प्रकाशित केला. या वृत्ताची दखल घेत गुरुवारी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी प्रपाठक, शासकीय ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथक, पैठण यांना नोटीस बजावली.
या बाबींचा करा खुलासा
परीक्षा केंद्रावर कोरोनाबाधित रुग्ण परीक्षा देत आहे, याची कल्पना असतानासुद्धा आपण या परीक्षा केंद्र संचालकांना अथवा पोलीस विभागाला याबाबत माहिती का दिली? नाही? सदर विद्यार्थ्यास कोविड सेंटरमधून महाविद्यालयात परीक्षेला जाण्याची परवानगी कोणी दिली? संबंधित विद्यार्थ्याकडून तसे लेखी हमीपत्र घेण्यात आले होते काय? नातेवाईक व पोलीस कर्मचारी त्याच्यासोबत गेले होते काय? परीक्षेला जाण्याच्या वेळी विद्यार्थ्याने कोणाची परवानगी घेतली होती? ज्यांनी परवानगी दिली असेल त्यांचे नाव व पदाचा खुलासा करा.