पथक कुचकामी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संथ गतीने
By Admin | Updated: September 3, 2016 00:27 IST2016-09-03T00:16:00+5:302016-09-03T00:27:01+5:30
जालना : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याची वर्षातून किमान दोनदा आरोग्य तपासणी होणे बंधनकारक आहे.

पथक कुचकामी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संथ गतीने
जालना : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याची वर्षातून किमान दोनदा आरोग्य तपासणी होणे बंधनकारक आहे. तसेच शाळांनाही विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी ३ लाख ३७ हजार १७९ विद्यार्थ्यांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
शाळा सुरू होऊन अडीच महिने उलटूनही आत्तापर्यंत ३२ हजार ११५ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आल्याचे शासकीय रूग्णालयाच्या वतीने सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात किती विद्यार्थ्यांत विविध आजार आढळून आले. किती याची माहिती संबंधित विभागाला सांगता आली नसल्याने निव्वळ कागदी घोडे नाचवून तपासणीच्या नावाखाली आकडे फुगविण्यात येत असल्याचे गंभीर चित्र आहे.
ग्रामीण भागातील नागरिक आरोग्याविषयी जागरूक नसतात. तसेच सध्याच्या काळात वैद्यकीय सेवा महागडी झाल्याने गोरगरीब किरकोळ आजाराकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे किरकोळ आजाराचे रूपांतर गंभीर आजारात होते. यातून जिवितास धोका संभवतो. त्यामुळे शासनाने राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम हाती घेवून विद्यार्थ्यांची सर्वांगीन आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यात ३२ पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात एक महिला आणि एक पुरूष असे दोन वेद्यकीय अधिकारी एक औषधी निर्माता आणि त्यांच्या मदतीसाठी एक नर्स असे चौघांचे पथक नेमण्यात आले आहे. परंतु सध्या शासकीय रूग्णालयात १० मेडीकल आॅफिसर, ७ औषधी निर्माता पद आणि २ ए. एन. एम नर्स पद रिक्त असल्याने या कार्यक्रमावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना वेळवर उपचार मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना खाजगी रूग्णालयाचा आधार घेण्याची वेळ आली आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. अनेक विद्यार्थ्यांना हृदयविकार, डोळ्याचे आजार, कान-नाकाचे आजार, मिरगी, दाताचे विकार असतात. त्याचे निदान होणे गरजेचे आहे. त्यासाठी शालेय आरोग्य तपासणी नियमति झाल्यास विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहू शकते.
विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्याला गंभीर आजार आढळून आल्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडे रेफर करणे आवश्यक आहे. एखाद्या विद्यार्थ्यांवर गंभीर शस्त्रक्रिया आवश्यक असल्यास ती मोफत करण्याची तरतूद शासनाने केली आहे. मात्र आरोग्य यंत्रणेच्या उदासिनतेमुळे याचा लाभ विद्यार्थ्यांपर्यत पोहचत नसल्याचे चित्र आहे. शासनाचे आरोग्य केंद्र, उपकेंद्र, तालुका आरोग्य अधिकरी कार्यालय एवढी यंत्रणा काय कामाची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे. यासाठी आरोग्य विभागाने सर्वच तालुकास्तरावर शालेय आरोग्य तपासणी पथकाची निर्मिती केली. या पथकाला वाहन व आवश्यक निधीही पुरविला. मात्र, शाळा सुरू होऊन अडीच महिने उलटले तरी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीचे काम संथ गतीने सुरू आहे. विद्यार्थ्यांना खाजगी रूग्णालयात तपासणी करण्याची वेळ आली आहे.
- सरिता पाटील,
जिल्हा शल्यचिकीत्सक