जि.प.मध्ये बसून शिक्षक घेतात पगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:52 IST2017-09-23T00:52:41+5:302017-09-23T00:52:41+5:30
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत ९१ शिक्षकांना वर्षभरापासून बसून पगार दिला जातो

जि.प.मध्ये बसून शिक्षक घेतात पगार
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत ९१ शिक्षकांना वर्षभरापासून बसून पगार दिला जातो. आजही जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शाळांना शिक्षक नाहीत. शिक्षकांच्या मागणीसाठी अनेक शाळांना ग्रामस्थांकडून कुलूप लावले जाते. त्यामुळे या शिक्षकांना बसून पगार देण्याऐवजी त्यांना तोंडी आदेशाद्वारे जेथे गरज आहे, अशा शाळांवर त्यांना तात्पुरती नेमणूक देण्याचे आदेश जि. प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिले.
या प्रश्नाकडे अविनाश गलांडे, किशोर बलांडे, रमेश बोरनारे, रमेश गायकवाड, मधुकर वालतुरे या सदस्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. तेव्हा शिक्षणाधिकारी रवींद्र वाणी यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की, २०१३-१४ पासून शाळांच्या संच मान्यता आॅनलाइन झाल्या. त्यानंतर २०१५-१६ मध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची वर्गवारी नव्याने निश्चित करण्यात आली. पूर्वी माध्यमिक शाळेला जोडलेला आठवीचा वर्ग हा वर्गवारी निश्चितीमध्ये उच्च प्राथमिक शाळेला जोडला. त्यामुळे माध्यमिक शाळेमध्ये पदवीधर प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत ९१ शिक्षक हे प्राथमिक शिक्षक म्हणून आता अतिरिक्त ठरले. या शिक्षकांना नियमानुसार रिक्त पदांवर सामावून घ्यावे लागेल.
यावेळी मधुकर वालतुरे म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना गणित व इंग्रजी शिकविणारे शिक्षक नाहीत. त्यामुळे या शिक्षकांना प्राथमिक शाळांमध्ये सामावून घेतल्यास गणित व इंग्रजी विषय शिकविण्याचा प्रश्न निकाली निघू शकेल. तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांनी शिक्षणाधिकारी वाणी यांना सूचना केली की, यासंबंधी विभागीय उपायुक्त पारस बोथरा यांच्याशी चर्चा करा. त्यांचा सल्ला घ्या आणि अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न निकाली काढा. तेव्हा उपस्थित सदस्यांनी आग्रह धरला की, सध्या प्राथमिक शाळांना शिक्षकांची गरज आहे. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची अडचण येत असेल, तर त्यांना तोंडी आदेश देऊन शाळांवर नियुक्ती द्यावी.