‘चाईल्ड पॉप्युलेशन’साठी शिक्षकांची वस्ती, तांड्यावर धावाधाव
By Admin | Updated: December 15, 2014 00:49 IST2014-12-15T00:36:32+5:302014-12-15T00:49:02+5:30
शांतीलाल गायकवाड, औरंगाबाद शिक्षक गाव, वस्त्या, तांडे, वाड्या तुडवीत फिरत आहेत.

‘चाईल्ड पॉप्युलेशन’साठी शिक्षकांची वस्ती, तांड्यावर धावाधाव
शांतीलाल गायकवाड, औरंगाबाद
आपल्या भागातील ‘चाईल्ड पॉप्युलेशन’ नेमके किती, हे वयोगटानुसार शोधून काढण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर टाकण्यात आली असून, त्यासाठी शिक्षक गाव, वस्त्या, तांडे, वाड्या तुडवीत फिरत आहेत. मिळणाऱ्या माहितीतून गाव, वस्त्या, तांडे व वाड्यानिहाय शाळा विकास आराखडा व शिक्षण पत्रिका तयार केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार (२००९) अधिनियमाच्या कलम १२ (३) व २२ नुसार त्या-त्या भागातील ‘विद्यार्थी संख्ये’नुसार वस्त्या, तांडे व वाड्यानुसार शिक्षणपत्रिका व शिक्षण विकास आराखडा तयार करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे वयोगटानिहाय ‘चाईल्ड पॉप्युलेशन’च्या शोधात शिक्षक बाहेर पडले आहेत.
शिक्षकांना कुटुंब पत्रिका भरून घ्यावी लागते आहे. त्यात जातसंवर्ग, व्यवसाय, कुटुंबातील सदस्य संख्या (स्त्री-पुरुष), ० ते १८ वयोगटातील मुलांची संख्या, दुर्बल घटकांचा असल्यास स्वतंत्र तपशील भरला जातो.
विशेष म्हणजे शिक्षणपत्रिकेत प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र नमुन्यात माहिती भरावी लागते. लिंग, जन्मतारीख, शाळेत जातो किंवा नाही, कोणत्या शाळेत, शाळेतील सुविधांचा तपशील, अपंगत्व असल्यास नोंद करणे, विशेष गरजा असलेल्या मुलांची संख्या आदी सर्वच माहिती शिक्षण पत्रिकेत भरणे अनिवार्य करण्यात आले आहे.
उपरोक्त काम हे शैक्षणिक स्वरूपाचे व दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त असल्याने या किचकट विषयातही शिक्षक व शिक्षिका आनंदाने सहभागी झाल्याची प्रतिक्रिया प्राथमिक शिक्षक संघाचे संजीव बोचरे, सुनील चिपाटे, मनोज चव्हाण, गणेश तांदळे, सुभाष भानुसे, जयाजी भोसले, अनिल सिरसाट यांनी नोंदविली आहे.