शिक्षक विलास काकडेला अटक; १६ पर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:31 IST2017-08-12T00:31:01+5:302017-08-12T00:31:01+5:30
विद्यार्थिनींची छेड काढल्याप्रकरणी पालकांनी चोप दिल्यापासून पसार झालेल्या पोदार शाळेचा शिक्षक विलास काकडे (रा. भोईवाडा) यास गुन्हे शाखा पोलिसांनी जालना जिल्ह्यातील त्याच्या बहिणीच्या घरातून अटक केली.

शिक्षक विलास काकडेला अटक; १६ पर्यंत पोलीस कोठडी
लोकमत न्यूज
नेटवर्क
औरंगाबाद : विद्यार्थिनींची छेड काढल्याप्रकरणी पालकांनी चोप दिल्यापासून पसार झालेल्या पोदार शाळेचा शिक्षक विलास काकडे (रा. भोईवाडा) यास गुन्हे शाखा पोलिसांनी जालना जिल्ह्यातील त्याच्या बहिणीच्या घरातून अटक केली. आज त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास १६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली.
याविषयी अधिक माहिती देताना जवाहरनगर पोलिसांनी सांगितले की, गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणाºया पोदार शाळेतील गणिताचा शिक्षक विलास काकडे याच्या गैरवर्तनाचा भंडाफोड विद्यार्थिनींनीच केला. एका पालकाने ९ आॅगस्ट रोजीच शाळेत जाऊन शिक्षक काकडे याच्या कानाखाली लगावली आणि शाळा प्रशासनाकडे याविषयी त्यांनी तक्रार केली. हा प्रकार अन्य विद्यार्थिनींच्या पालकांना माहीत होताच ते सर्व जण गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शाळेत गेले. यावेळी काकडेला गाठून त्यास चांगलाच धडा शिकविण्याच्या तयारीत पालक होते. मात्र काकडेला आदल्या दिवशीच शाळेतून बडतर्फ केल्याची माहिती प्रशासनाने पालकांना दिली. यानंतर संतप्त पालकांनी काकडेविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. नगरसेवक राजेंद्र जंजाळ आणि पालकांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी शिक्षकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. एका पालकाने नोंदविलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार गुन्ह्याची नोंद केली. आपल्याविरुद्ध पालक संतप्त झाल्याचे कळताच काकडे औरंगाबादेतून पळून गेला. तो जालना जिल्ह्यात राहणाºया बहिणीच्या घरी लपून बसल्याची माहिती खबºयाने गुन्हे शाखा पोलिसांना दिली. गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकाने रात्री उशिरा जालना जिल्ह्यातून आरोपीला अटक करून औरंगाबादेत आणले.