शिक्षक संघटना राजकीय नकोत!
By Admin | Updated: September 6, 2014 00:42 IST2014-09-06T00:38:40+5:302014-09-06T00:42:13+5:30
औरंगाबाद : शिक्षक हा गौरवमूर्ती होता व कायम राहिला पाहिजे; परंतु शिक्षक संघटनांतील राजकारणामुळे हे क्षेत्रही बदनामीच्या नजीक पोहोचले आहे.

शिक्षक संघटना राजकीय नकोत!
औरंगाबाद : शिक्षक हा गौरवमूर्ती होता व कायम राहिला पाहिजे; परंतु शिक्षक संघटनांतील राजकारणामुळे हे क्षेत्रही बदनामीच्या नजीक पोहोचले आहे. राजकीय पक्षाशी संलग्न शिक्षक संघटना नकोच आहेत. त्यामुळे शिक्षकांतही मोठे राजकारण शिरले आहे, असे परखड मत राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात व्यक्त केले.
शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेतर्फे ६२ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शारदा जारवाल होत्या.
शिक्षक आमदार विक्रम काळे, उपाध्यक्षा विजया चिकटगावकर, शिक्षण सभापती बबन कुंडारे, बांधकाम सभापती डॉ. सुनील शिंदे, समाजकल्याण सभापती रामनाथ चोरमले, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, पंचायत समिती सभापती सरसाबाई वाघ, रेखा जगताप, जिल्हा शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख आदींची यावेळी मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
प्रभाकर पवारांचे ‘वार’
शिक्षक सेनेचे प्रभाकर पवार यांना पुरस्कार वितरणप्रसंगी मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली. यावेळी पवार यांनी जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रखर टीका केली.
जिल्हा परिषदेचे सदस्य सिमेंट बंधाऱ्यावर चर्चा करतात, इकडच्या तिकडच्या चर्चा होतात; परंतु विद्यार्थी गुणवत्ता अभियानावर ते सभेत चकार शब्द काढत नाहीत, असा थेट आरोप त्यांनी केला. आदर्श पुरस्काराच्या यादीवरही त्यांनी आक्षेप नोंदवून चुगली करणाऱ्यांना पुरस्कार दिले जातात, अशी बोचरी टीका केली. शेवटी मंचावर मान्यवरांनीच त्यांना आवरले व भाषण रोखण्यास भाग पाडले. त्यानंतर याच दिशेने कार्यक्रम पुढे सरकला.
आदर्श शिक्षकांना पुरस्कार
सतत चार वर्षांच्या खंडानंतर यावर्षी जिल्हा परिषदेने हे पुरस्कार घोषित केले. त्यामुळे सन २०११ पासून १४ पर्यंतच्या ६२ शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पुरस्कार विजेत्यांना आनंद; व्यासपीठावरून केल्या गेलेल्या टीका- टिपण्या, कोपरखळ्या व सूचना हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.