वेरूळ येथे गुरू-शिष्यांची मांदियाळी
By Admin | Updated: July 13, 2014 00:38 IST2014-07-13T00:35:28+5:302014-07-13T00:38:41+5:30
वेरूळ : वेरूळ येथील महामंडलेश्वर शांतीगिरी महाराजांच्या आश्रमात हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.
वेरूळ येथे गुरू-शिष्यांची मांदियाळी
वेरूळ : वेरूळ येथील महामंडलेश्वर शांतीगिरी महाराजांच्या आश्रमात हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. आलेल्या भक्तांनी प.पू. शांतीगिरी महाराजांचे पूजन केले. दहशतवादविरोधी पथकाचे अध्यक्ष मनिंदरजितसिंग बिट्टा यांनीही आश्रमास भेट देऊन महाराजांचे आशीर्वाद घेत उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले.
सकाळपासूनच राज्यातील शिष्यांची शांतीगिरी महाराजांच्या आश्रमात गर्दी झाली होती. त्यात मनिंदरजितसिंग बिट्टा येणार असल्याने जागोजागी कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती. गुरुपूजनानंतर शांतीगिरी महाराजांनी भाविकांना उपदेश केला. ज्यांनी गुरू केला नाही, त्यांचा जन्म वाया गेला. जनार्दन स्वामींच्या दोह्यावर उकल करताना त्यांनी गुरूचे महत्त्व विशद केले.
यानंतर मनिंदरजितसिंग बिट्टा यांनीही मार्गदर्शन केले. राष्ट्रप्रेम कमी होत असून जागोजागी दहशतवाद निर्माण होत आहे, ही देशासाठी चिंतेची बाब आहे. राष्ट्रप्रेम, सर्वधर्म सहिष्णुता निर्माण होण्यासाठी प्रत्येकाने गुरू करून त्याच्या चरणी नतमस्तक झाले पाहिजे, आदी मुद्यांवर त्यांनी उपदेश केला. शांतीगिरी महाराजांनी बिट्टा यांना पूजेचे भांडे भेट म्हणून दिले. यावेळी शिष्य केशवराव गोसावी यांनी शांतीगिरी महाराजांना टाटा सफारी गाडी भेट दिली. कार्यक्रमासाठी शांतीगिरी महाराजांसह जय बाबाजी परिवाराने परिश्रम घेतले.
कैलास आश्रम, टाका स्वामी, पारेश्वर आश्रम, नाथ आश्रमातही गुरुपौर्णिमा उत्सव साजरा झाला. कैलास आश्रमात शिष्यांनी महामंडलेश्वर भागवतानंदगिरीजी महाराजांचे पूजन केले. वेरुळात आज दिवसभर गुरू-शिष्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. (वार्ताहर)