गुणवत्तावाढीसाठी ‘शिक्षकमित्र’ उपक्रम
By Admin | Updated: September 2, 2014 01:49 IST2014-09-02T00:52:58+5:302014-09-02T01:49:04+5:30
कळमनुरी : इंग्रजी व गणित विषयाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आता चालू शैक्षणिक वर्षापासून ‘शिक्षकमित्र’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शिक्षकांना जिल्हास्तरावर मार्गदर्शन

गुणवत्तावाढीसाठी ‘शिक्षकमित्र’ उपक्रम
कळमनुरी : इंग्रजी व गणित विषयाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आता चालू शैक्षणिक वर्षापासून ‘शिक्षकमित्र’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शिक्षकांना जिल्हास्तरावर मार्गदर्शन करण्यात येणार असून पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबविला जात आहे.
विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजीचे ज्ञान आत्मसात व्हावे, त्यांना या विषयाची भीती वाटू नये, शिक्षकांनाही हा विषय सुलभतेने शिकविता यावा, यासाठी हा शिक्षकमित्राचा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी दिली.
या उपक्रमाअंतर्गत तज्ज्ञ मार्गदर्शकांना जिल्हास्तरावर २८ आॅगस्ट रोजी मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक बीट स्तरावर पहिली ते पाचवीचे ३ फुल व सहावी ते आठवीला शिकविणाऱ्या शिक्षकांचे दोन गट तयार करण्यात येणार आहेत. शिक्षकांची बैठक व्यवस्था होईल अशाच शाळेवर हे बीट स्तर प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणात गणित व इंग्रजी विषयातील त्या-त्या महिन्याच्या वार्षिक नियोजनानुसार येणारे आशयातील कठीण संबोध संकल्पना यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी सनियंत्रण अधिकाऱ्यांच्या व सहाय्यक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
कळमनुरीसाठी विस्तार अधिकारी एस. बी. सोनुने, डोंगरकड्यासाठी एन. बी. बळवंते, वडकुते, नरवाडे यांची नांदापूर बीटसाठी गंगावणे, डवरे यांची तर शेवाळ्यासाठी पी. जी. भोसले, एम. डी. नरवाडे, बालाजी गोरे यांची निवड करण्यात आली आहे. कन्या कळमनुरीचे प्रशिक्षण प्रशाला कळमनुरी डोंगरकडा बीटचे प्रशाला डोंगरकडा, नांदापूर बीटचे कें. प्रा. शा. नांदापूर शेवाळा बीटचे प्रशाला आखाडा बाळापूर येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
प्रशिक्षणाला शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आदी भेटी देऊन वेळोवेळी पाहणी करणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या शाळांबरोबरच ग्रामीण भागात चांगले शिक्षण मिळत नसल्याची ओरड होत आहे. दहावीच्या निकालामध्येही अनेक शाळा मागे पडल्याचे दिसून आले. अशा स्थितीत शिक्षण विभागाच्या वतीने नवनवीन उपक्रम राबवून गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राबविण्यात येत असलेल्या ‘शिक्षकमित्र’ उपक्रमामुळे निश्चित ही स्थिती बदलेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)