बदलीच्या धसक्याने शिक्षकाचा मृत्यू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:33 IST2017-10-28T00:33:30+5:302017-10-28T00:33:40+5:30
बदलीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांपासून नेट कॅफेवर जागरण आणि बदलीचा ताण सहन न झाल्यामुळे साळेगाव केंद्रातील मांगवडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहशिक्षक मधुकर दत्तात्रय साळवे (४९) यांचा हृदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला

बदलीच्या धसक्याने शिक्षकाचा मृत्यू !
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : बदलीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांपासून नेट कॅफेवर जागरण आणि बदलीचा ताण सहन न झाल्यामुळे साळेगाव केंद्रातील मांगवडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहशिक्षक मधुकर दत्तात्रय साळवे (४९) यांचा हृदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजता घडली.
शिक्षकांच्या बदलीसाठीचे आॅनलाईन फॉर्म भरण्यासाठी वेब साईट व्यवस्थित न चालणे आणि बदली अर्ज भरण्यासाठीचे शिक्षण विभागाचे पोर्टल बंद पडणे, यामुळे मागील दोन दिवसांपासून मधुकर सावळे हे इंटरनेट कॅफेवर जागरण आणि बदली कोठे होणार या भीतीच्या मानसिक तणावात होते.
बुधवारी दुपारी ४ वाजता त्यांना अस्वस्थता जाणवू लागली आणि चक्कर येत असल्याने त्यांना कळंब (जि. उस्मानाबाद) येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर बार्शी येथे हलविण्यात येत असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर कळंब येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.