करदात्यांना त्रासच त्रास!
By Admin | Updated: July 24, 2014 00:38 IST2014-07-24T00:17:57+5:302014-07-24T00:38:25+5:30
औरंगाबाद : महापालिकेला प्रामाणिकपणे मालमत्ता, पाणीपट्टी आदी कर देणारे नागरिक भरपूर आहेत.

करदात्यांना त्रासच त्रास!
औरंगाबाद : महापालिकेला प्रामाणिकपणे मालमत्ता, पाणीपट्टी आदी कर देणारे नागरिक भरपूर आहेत. त्यांच्या आर्थिक साह्यामुळे मनपाच्या आर्थिक संकटाला थोडाफार हातभार लागतो; पण करदात्यांना त्रास देण्याचे प्रशासनाने सुरू केले आहे की काय? एखाद्या रस्त्याकडे किती वर्षे दुर्लक्ष करणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
संस्थान गणपती
शहराचे आराध्य दैवत असलेल्या संस्थान गणपतीसमोरील रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. वाहनधारकांसह पायी ये-जा करणाऱ्यांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. मागील अनेक वर्षांपासून महापालिकेने या रस्त्याकडे कधीच लक्ष दिले नाही. सकाळी, सायंकाळी मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. जुन्या शहरात राहणाऱ्या नागरिकांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो. महापालिकेला कर भरूनही खड्ड्यांमधून वाट काढावी लागत असल्याबद्दल अनेकांनी खंत व्यक्त केली. काहींनी तर मनपाला कर भरणेच बंद करावे लागेल, असे नमूद केले. विशेष बाब म्हणजे महापालिकेच्या सत्तेचा ‘रिमोट’ ज्यांच्या हातात आहे, ते नेतेही दर्शनासाठी अधूनमधून येतात. त्यांना हा खराब रस्ता दिसत नाही का असा प्रश्न काही सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला.
बारुदगरनाला ते औरंगपुरा
शहराच्या कोणत्याही भागात राहणारा नागरिक औरंगपुरा भाजीमंडईत खरेदीसाठी येतच असतो. भाजीमंडईकडे येणारा एक रस्ता म्हणजे बारुदगरनाला ते सुराणा अपार्टमेंट होय. हा रस्ता मागील अनेक वर्षांपासून मनपाने दुरुस्त केलेला नाही. यापूर्वी एकदा डागडुजी करण्यात आली होती. सध्या रस्त्यात ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने काही दिवसांपूर्वीच ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू केले. त्यामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. रात्री तर या खड्ड्यांमध्ये चारचाकी आणि रिक्षाचालक हमखास अडकून पडतात. आसपास राहणाऱ्या नागरिकांना वाहन बाहेर काढण्यासाठी मदतीला बोलावण्यात येते. मागील आठ दिवसांपासून तर हे प्रकार खूपच वाढले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मोंढा ते अंगुरीबाग
शहरातील अत्यंत जुनी बाजारपेठ असलेल्या मोंढा ते अंगुरीबाग रस्ताही वाहनधारकांच्या अंगाला काटा आणणारा आहे. मागील अनेक वर्षांमध्ये या रस्त्याची डागडुजी करण्यात आलेली नाही. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी डागडुजी प्रामाणिकपणे केली जाते. हा रस्ता गुळगुळीत करण्यात यावा, रस्त्यावर पाणी थांबणार नाही अशी व्यवस्था करावी, अशी व्यापाऱ्यांसह रहिवाशांची अपेक्षा आहे. महापालिकेने आतापासूनच या रस्त्याचा विचार केल्यास गणेशोत्सवापूर्वी रस्ता तयार होईल. या भागातील व्यापारी, सर्वसामान्य नागरिक दरवर्षी मनपाला शंभर टक्के कर भरतात. करदात्यांनाच त्रास देण्याचे धोरण महापालिका प्रशासनाने स्वीकारल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. या भागातील लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला.